⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

देशभरातील बोगस डॉक्टरांवर सीबीआयच्या धाडी, जळगाव जिल्ह्यातील डॉक्टराचा समावेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२२ । देशभरात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले आहे. अनेक जण वैद्यकीय शिक्षण न घेता प्रमाणपत्र नसताना देखील वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. आता अशातच बोगस डॉक्टरांवर सीबीआयने धाडी टाकल्या आहेत. डॉक्टर होण्यासाठी गरजेची असलेली राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची ‘फाॅरेन मेडिकल गॅज्युएट इंटरन्स’ (एफएमजीई) ही परीक्षा पास नसताना देखील रजिस्ट्रेशन करणाऱ्या देशातील ७३ डॉक्टरांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील एका डॉक्टरचा समावेश आहे

सर्वसामान्य आणि अत्यंत गरीब कुटुंबातील रुग्णांना मोठ्या रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाही. त्यामुळं हे रुग्ण जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. मात्र, देशात गेल्या काही वर्षांत परदेशातून परतलेल्या डॉक्टरांनी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची ‘फाॅरेन मेडिकल गॅज्युएट इंटरन्स’ (FMGE) ही परीक्षा परीक्षा उत्तीर्ण न करता विविध राज्यांच्या वैद्यकीय परिषदेत नोंदणी करून प्रॅक्टिस सुरू केल्याचा आरोप आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफएमजीई आवश्यक परीक्षेत नापास झाल्यानंतरही रजिस्ट्रेशन करणाऱ्या ७३ डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दिल्लीच्या सीबीआय पथकाने देशभरातील 91 ठिकाणी छापे टाकले होते. दरम्यान, सीबीआयच्या वेबसाईटवर असलेल्या एफआयआर नुसार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील डॉ. दीपक अशोक पाटील (सुप्रभा कॉलनी धुळे रॉड, अमळनेर) यांचा समावेश आहे. त्यांनी चीनमधून एमबीबीएस पूर्ण केले आहे. परंतू एफएमजीई परीक्षा नापास झाल्यानंतरही त्यांनी रजिस्ट्रेशन करून प्रॅक्ट्रीस सुरु केल्याचा आरोप आहे.

14 राज्यांतील मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे अज्ञात शासकीय अधिकारी आणि खाजगी व्यक्ती देखील सीबीआयच्या रडारवर आहेत. चौकशीच्या कक्षेत घेतल्या आहेत. परदेशात वैद्यकशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर, सर्व डॉक्टरांना भारतात सराव करण्यासाठी FMGE (फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा) स्क्रीनिंग चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. गेल्या काही वर्षांत परदेशातून परतलेल्या डॉक्टरांनी ही परीक्षा उत्तीर्ण न करता विविध राज्यांच्या वैद्यकीय परिषदेत नोंदणी करून प्रॅक्टिस सुरू केल्याचा आरोप आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या अध्यक्षांनी यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. त्यानंतर विभागाच्या केंद्रीय सचिवांनी सीबीआयला चौकशीसाठी पत्र लिहिले. देशभरातील 73 डॉक्टरांची नावे समोर आली होती. त्यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील डॉ. दीपक आणि डॉ. निलेश पाटील यांची नाव समोर आली होती. दरम्यान, सीबीआयने १२० ब, ४२०,४६७,४६८, ४७१ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.