जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२६ । जळगावसह महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. एप्रिल महिन्याची सुरुवात होताच उन्हाळ्याची तीव्रता वाढण्याची अपेक्षा असताना, उलट अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असून काही ठिकाणी गारपीट झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आगामी तीन ते चार दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज अलर्ट?
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला असून हवामान विभागाने आज दि. २ व ३ एप्रिल रोजी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ऐन उन्हाळ्यात अवघ्या १५ दिवसांत तब्बल तीनवेळा ऑरेंज अलर्ट देण्याची वेळ आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या पावसाळ्यात जास्त पावसासाठी केवळ सप्टेंबर महिन्यात एकदाच तीव्र इशारा देण्यात आला होता. मात्र, यंदा एप्रिलच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात पावसाळ्यापेक्षा भयावह स्थिती निर्माण झाली आहे. काल दि. १ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने आधी ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. तर २ व ३ एप्रिल रोजी देखील ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. मात्र, हवामान विभागाने अंदाजात बदल करून आता आगामी दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्याने प्रशासनासह बळीराजाची देखील चिंता वाढली आहे.
हवामान खात्यानं आज ३ एप्रिल आणि उद्या ४ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान जिल्ह्यात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळ येण्याची शक्यता आहे. तसेच ढगांच्या गडगडाटासह पावसाची जोरदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर वादळी वाऱ्यासोबतच जिल्ह्याच्या काही भागांत गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली.
अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनीही वादळी वाऱ्याच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पारा घसरला?
दरम्यान निर्माण झालेल्या अवकाळी पावसाच्या स्थितीमुळे जळगावचा पारा घसरला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यातून जळगावकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. बुधवारी जळगावचे कमाल तापमान ३५.६ अंश तर किमान तापमान २३ अशांहुन अधिक होते.







