जळगाव लाईव्ह न्युज । १९ जुलै २०२२ । ऑनलाईन फसवणुकीच्या घटना काही केल्या कमी होत नाहीय. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होतानाचे दिसून येत आहे. याच दरम्यान, जळगावमध्ये भामट्यांनी एका डॉक्टरला ६० हजार रुपयाचा चुना लावला आहे. वीजबिल अपडेट संदर्भात मोबाइलवर आलेल्या एका अनोळखी मेसेजमधील क्रमांकावर फोन करून भामट्याने त्यांना विश्वासात घेऊन ५९ हजार ८७५ रुपये परस्पर वर्ग करून ऑनलाइन फसवणूक केली. डॉ. दीपक रमाकांत पाटील (वय ६९, रा. पंचम हॉस्पिटल, भास्कर मार्केट) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
नेमका काय आहे प्रकार?
डॉ. दीपक रमाकांत पाटील यांच्या घराचा वीजपुरवठा १६ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता खंडित झाला. त्यांनी महावितरणने दिलेल्या अधिकृत फोन नंबरवर कॉल केला. हा कॉल कुणीही रिसीव्ह केला नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय झाली. दरम्यान, १५ जुलै रोजी डॉ. पाटील यांना ७४७७६२६०९६ या अनोळखी मोबाइलवरून मेसेज आलेला हाेता. या मेसेजमध्ये ‘तुमचे मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याने आज रात्री ९.३० वाजता तुमचा पुरवठा खंडित केला जाईल. कृपया ९७४९१७००३७ या नंबरवर संपर्क करा’ असे लिहिलेले होते. महावितरणने फोन रिसीव्ह केला नाही. एक दिवस आधीच वीजपुरवठा खंडित करण्याची सूूचना देणारा मेसेज आला आहे.
यामुळे संबंधित मेसेज देखील महावितरणकडूनच आला असेल असा गैरसमज डॉ. पाटील यांचा झाला. त्यांनी मेसेजवर मिळालेल्या मोबाइलवर संपर्क साधला. या वेळी भामट्याने एक लिंक पाठवली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगीतले. त्याच्या माध्यमातून सुरूवातीला १० रुपये घेतले. यानंतर भामट्याने डॉ. पाटील यांना विश्वासात घेऊन बँक खात्याच्या संदर्भात माहिती, ओटीपी विचारुन घेतले. काही वेळातच डॉ. पाटील यांच्या खात्यातून ५९ हजार ८७५ रुपये परस्पर वर्ग झाल्याचे मेसेज आले. आपली फसवणूक झाल्याचे डॉ. पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.