वीज बिल अपडेट करण्याच्या नावाखाली सेवानिवृत्ताला लावला लाखो रुपयाचा चुना

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२३ । ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसतेय. अशातच वीज बिल अपडेट करण्याच्या नावाखाली रेल्वे कॉलनीमध्ये राहणा-या सेवानिवृत्त वृध्दाला सायबर ठगाने १ लाख ७५ हजार रूपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सेवानिवृत्ताच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे कॉलनी येथे गोविंद ईश्वरदास पाराशर हे कुटूंबासह वास्तव्यास असून सन २०१५ मध्ये तापी पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. गुरूवार, दि. १९ जानेवारी रोजी त्यांना दुपारी एक अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. तुमचे वीज बिल भरलेले आहे पण, ते अपडेट झालेले नाही. तुम्हाला लिंक पाठविली जाईल. नंतर ॲप लाउनलोड करावे, असे कॉलवरील व्यक्तीने पाराशर यांना सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी ॲप लाउनलोड केले.

मात्र, काही वेळानंतर त्यांना बँक खात्यातून २५ हजार रूपये कपात झाल्याचा एसएमएस प्राप्त झाला. त्यांनी लागलीच बँकेत जावून विचारपूस केल्यावर नेट बँकींगद्वारे कुणीतरी १ लाख ७५ हजार रूपये वळते करून घेतले असल्याचे समोर आले. अखेर शुक्रवारी पाराशर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार सायबर ठगाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.