⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगावात शहरात ऑनलाईन सट्ट्याच्या कारवाया गुलदस्त्यात

जळगाव लाईव्ह न्यूज | १३ जून २०२१ | शहरात ऑनलाईन सट्टा बिनधास्तपणे घेतला जात असून पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सट्टा घेणारे उभे असतात. पोलिसांना सर्व ठाऊक असताना देखील कोणतीही कारवाई केली जात नाही. काही महिन्यांपूर्वी सहाय्यक अधिक्षकांनी कारवाई केली होती परंतु त्याचे पुढे काय झाले याबाबत माहिती देण्यात आली नाही. तसेच कारवाईनंतर आज अनेक ठिकाणी ऑनलाईन सट्टा घेतला जात असून पुढे काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

जळगाव शहराचा मध्यवर्ती भागात बळीराम पेठ, रेल्वेस्टेशन, शनिपेठ, शिवाजी नगर, एमआयडीसी परिसर, सिंधी कॉलनी, पिंप्राळा हुडको, जुने जळगाव, रामानंद नगर, नूतन बस स्थानक, मेहरूण, जुने बस स्थानक परिसरात ऑनलाईन सट्टा घेणारे इसम उभे असतात. पोलिसांना सर्व माहिती असताना देखील कारवाई होत नाही. मोबाईलवर सट्टा घेणाऱ्याचा मोबाईल तपासल्यास त्यात सर्व माहिती मिळू शकते. जळगाव जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतकेच मुख्य बुकी असून त्यांच्या मार्फत सर्व व्यवहार होत असतो. परंतु पोलिसांचेच बुकी सोबत बसणे असल्याने कारवाई करणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सट्ट्यामुळे अनेकांचे आयुष्य वाया गेले असून अनेकांच्या संसाराची वाताहत होत आहे. कितीतरी तरुण सट्ट्यामुळे कर्जबाजारी झाले असून महिलावर्ग देखील सट्टा खेळायला लागला आहे. दिवसेंदिवस सट्टा घेणारे वाढत असून त्यांना लगाम केवळ वरिष्ठ पोलीस अधिकारीच घालू शकतात अशी आशा जळगावकर नागरिक व्यक्त करीत आहेत.