निर्यातबंदी उठताच कांद्याच्या दरात मोठी वाढ ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२४ । कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. निर्यातबंदी उठताच कांद्याच्या दरात वाढ दिसून आली. कांद्याचे भाव तब्बल ५०० रुपयांनी वधारले असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कांद्याला चांगला भाव मिळत आहे. निर्यातबंदी हटवल्याने कांद्याचे भाव प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वधारले आहेत. दरम्यान केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य असून शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. परंतु हा निर्णय आधी घेतला असता, तर शेतकऱ्यांना यापेक्षाही अधिक फायदा झाला असता, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपला माल विकून टाकलेला असून आता बाजारात येणारा कांदा अल्प प्रमाणात राहणार आहे.
सध्या स्टॉक करण्याचं सीजन असल्यामुळे काही व्यापारी आणि शेतकरी कांद्याचा स्टॉक करू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याला आणखीच चांगला भाव मिळू शकतो, असंही कांदा व्यापाऱ्याने सांगितलं आहे.