जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. यानंतर बच्चू कडू आक्रमक झाले असून सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

बच्चू कडू यांनी 1 नोव्हेंबर रोजी मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. बॉम्ब कुठे आणि कसा फोडायचा हे आपल्याला बरोबर माहीत आहे, असं सांगतानाच उद्या राजीनामा द्यावा लागला तरी बेहत्तर. एकदा आमच्या डोक्याच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही आरपारची लढाई करतो. तुम्ही चुकीच्या पद्धतीने आरोप करत असाल तर आम्ही आंडूपांडू थोडीच आहोत. आम्ही शेतकरी आहोत. जिथं मोकळं रान आहे तिथे नांगर घालू, असा इशारा त्यांनी दिला.
माझा इशारा हा फुसका बार आहे की बॅाम्ब आहे, हे 1 तारखेला दाखवू. हा बॉम्ब कसा कुणाच्या खाली लावायचा हे बच्चू कडूला चांगलं माहीत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलायला हवं, नाही तर आम्ही आमचं काम करू. अस्तित्वंच धोक्यात येत असेल तर मग याचं काय करणार? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.