गुन्हेजळगाव जिल्हा

Amalner : घरफोड्या करून पैसे जमविले, कार खरेदी करण्यासाठी गेला अन् तिथेच अडकला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२४ । घरफोड्या करून पैसे साठविले. त्या पैशातून कार खरेदी करण्यासाठी गेला असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून दहिवद येथील पाच घरफोड्यांची उकल झाली आहे. तर त्याच्याकडून दोन लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ग्रामीण भागात घरांच्या किल्ल्या दाराजवळ लावून शेतकरी शेतात जातात. अशा घरांतून चोऱ्या करण्याची पद्धत बिलवाडी (ता. जळगाव) येथील प्रवीण सुभाष पाटील याची आहे. त्यानुसार अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे काही दिवसांपूर्वी भर दुपारी बंद घरांचे कुलूप उघडून चोरी झाल्याची घटना घडली होती. यात पाच घरांतून सुमारे सव्वासात लाख रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्यानुसार घटनेपूर्वी आणि घटनेनंतर पोलिसांनी अमळनेर, धरणगाव व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिकदृष्ट्या प्रवीणचा प्रवास आणि घरफोडीतील वेळ जुळली. यानंतर पोलिसांनी प्रवीणवर पाळत ठेवण्यास सुरवात केली. दरम्यान प्रवीण हा १ डिसेम्बरला चोरीच्या पैशातून जळगावहून नवी गाडी घेण्याच्या तयारीत होता. याचवेळी पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकत त्याला ताब्यात घेतले. यानंतर त्याने अमळनेरात घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख ९७ हजार रुपयांची रोकड, ३६ हजार रुपयांची अंगठी, गुन्ह्यात वापरलेली ६० हजारांची दुचाकी असा एकूण दोन लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सहा महिन्यांपूर्वी प्रवीणला सुमारे १८ घरफोडी प्रकरणांत अटक करण्यात आली होती. अमळनेर येथील सरकारी वकील किशोर बागूल यांच्या घरीही दिवसा घरफोडी झाली होती. त्याने सिल्लोड, औरंगाबाद तसेच ग्रामीण भागात चोऱ्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button