अधिकारी थेट बाेगस ठरावांसाठी मध्यस्थी करतात, दूध उत्पादकाची तक्रार
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी केली जात आहे. त्यात संस्थांकडून यादीवर हरकती मागवण्यात आल्या आहेत. दूध उत्पादकांनी बाेगस ठरावांबाबत सहकार विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांवरच संशय व्यक्त करीत हरकती नाेंदवल्या आहेत. हे अधिकारी थेट बाेगस ठरावांसाठी मध्यस्थी करत असल्याची तक्रार वजा हरकत एका दूध उत्पादकाने नाेंदवली आहे.
जिल्हा सहकारी उपनिबंधक (दुग्ध) या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी २३ प्राथमिक दूध उत्पादक संस्थांचे लेखापरीक्षण करताना निकष बदलून यादी तयार केली असल्याची हरकत खेमचंद महाजन यांनी घेतली आहे. बाेगस ठरावांमुळे मुळ दूध उत्पादक वंचित राहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सहाय्यक सहकार अधिकार वासुदेव पाटील यांना २६ जून २०१९पासून सहकारी उपनिबंधक कार्यालयातील काम सांभाळून सहकारी संस्था (दुग्ध) या कार्यालयात सहाय्यक अधिकारी म्हणून पदभार दिलेला आहे. निवडणुकीतील ठरावांच्या प्रक्रियेबाबत त्यांच्याबाबत सर्वाधिक तक्रारी असून नाशिक येथील विभागीय सहनिबंधक गाैतम बलसाणे यांनी ५ जुलै राेजी त्यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढून घेत मुळ ठिकाणी रूजू हाेण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान, ते अजूनही त्याच कार्यालयात थांबून असल्याची तक्रार आहे. याबाबत उपनिबंधक (दुग्ध) आर. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बाेगस ठराव आणि हरकतींबाबत पुढे काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून आहे.