जळगाव मनपाकडून ऑफर!! ‘या’ मुदतीत घरपट्टी भरल्यास मिळणार ५ टक्क्यांची सूट!

जळगाव लाईव्ह न्यूज। २२ जुलै २०२३। जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे घरपट्टीची बिले नागरिकांना वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे. बिल मिळाल्यानंतर १५ दिवसांत रक्कम भरल्यास त्यावर पाच टक्के सूट देण्यात येईल, असे महापालिकेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. जळगाव शहरातील प्रभाग समिती क्रमांक एक ते चार मिळून एक लाख ३२ हजार मिळकती आहेत. त्यापैकी ५४ हजार बिलांचे वाटप करण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत शंभर टक्के बिलांचे वाटप होणार आहे.

प्रभाग समिती एक ते चारमधील मालमत्ताधारकांकडे मुदतीत बिल न वाटप केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रभाग समिती एक ते चार अंतर्गत येणाऱ्या मिळकतधारकांना शनिवारी व रविवारी या सुट्टीच्या दिवशीही प्रशासनाकडून बिलवाटप सुरू राहणार आहे. मिळकतधारकांनी बिल मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत देयक भरल्यास पाच टक्के सूट देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या प्रशासन विभागाकडून मालमत्ताकराचे मागणी बिलवाटप करण्यापूर्वी करभरणा केला आहे, अशा मालमत्ताधारकांना प्रथमच शून्य रकमेचे बिल देण्यात आले आहे. यामुळे बिलातील अडचण दूर करण्यात आली आहे. बिलामध्ये मालमत्ता मिळकतधारकाचे नाव व पत्त्यात काही दुरुस्ती करायची असल्यास बिलात दुरुस्ती प्रभाग समिती एक ते चार येथील कार्यालयात करण्यात येईल. त्यासाठी मालमत्ता मिळकतधारकांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.

३१ जुलैनंतर मिळकतधारकांना मालमत्ता कराचे मागणी बिलेवाटप झाल्यानंतर जप्तीची कारवाई महापालिका प्रशासनातर्फे केली जाणार आहे. ज्या मालमत्ता मिळकतधारकांनी मालमत्ता कराचा अद्याप भरणा केला नसेल, अशांनी मालमत्ता कराचा भरणा करून मालमत्ता जप्तीची होणारी अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.