आक्षेपार्ह वक्तव्य भोवले : निरीक्षक बकालेंचे निलंबन, चौकशी देखील सुरू

सप्टेंबर 15, 2022 1:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी रात्री उशिरा याबाबत आदेश काढले आहे. मराठा समाजाविषयी एका पोलीस अंमलदारसोबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे बकाले यांना चांगलेच भोवले असून त्यांची चौकशी देखील करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.

किरणकुमार बकाले jpg webp

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका पोलीस अंमलदाराशी फोनवर बोलत असताना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर आ.मंगेश चव्हाण आक्रमक झाले होते. लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर मंगळवारी रात्री उशिरा बकाले यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती.

बुधवारी मराठा समाजासह विविध संस्थांनी एकत्र येत पोलीस अधीक्षक कार्यालयावर धाव घेतली होती. बकाले यांना तातडीने निलंबित करा अशी त्यांची मागणी होती. यामध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकाऱ्याची बदली न झाल्यास मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ही दिला होता. या प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी त्यास निलंबित करण्यासह खातीनिहाय चौकशी लावतो असे आश्वासन दिले होते.

रात्री उशिरा पोलीस महानिरीक्षकांनी याबाबत आदेश काढले असून निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून सहाय्यक अधीक्षक चौकशी करणार आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now