जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे निलंबनकेल्यानंतर जळगाव जिल्हापेठ पोलिसात बकाले यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. दरम्यान, बकाले यांचे ज्या पोलिस कर्मचार्याशी हा संवाद घडला त्या कर्मचार्यासही जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी निलंबित केल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. सहाय्यक फौजदार अशोक महाजन असे निलंबित झालेल्या पोलीस कर्मचार्याचे नाव असून ते गुन्हे शाखेत हजेरी मास्तर म्हणून कर्तव्यास होते.
मराठा समाजाविषयी बकाले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडीओ क्लीप बुधवारी सोशल मिडीयात तुफान व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. गणेशोत्सव काळातील ही क्लीप असून त्याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बकालेंविरुध्द कठोर कारवाई करण्यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षकांना प्रस्ताव पाठवल्यानंतर बुधवारी सुरूवातीला बकाले यांना नियंत्रण कक्षात हलवण्यात आले तर रात्री 10 वाजता त्यांचे निलंबनाचे आदेश काढण्यात आले.
किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील नेमणूकीस असलेल्या एएसआय अशोक महाजन या कर्मचार्यशी बोलताना अत्यंत आक्षेपाहर्र्, घृणास्पद निंदणीय व विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणारे संभाषण केले होते. पोलिस निरीक्षक दर्जाच्या महत्वाच्या व जबाबदारीच्या पदावर कार्यरत असतांना विशिष्ट समाजाबद्दल अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर करण्यात आल्यानंतर पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली असून राज्यभरातील मराठा समाजबांधव प्रचंड संतप्त झाले आहेत.
बकालेंविरुद्ध अत्यंत गंभीर स्वरुपाच्या प्राथमिक चौकशी सुरु करण्यात आली असून या प्राथमिक चौकशीत बाधा आणू नये, फेरफार करू नये, ती पारदर्शकरित्या व्हावी, साक्षीदारांवर दबाव आणू नये किंवा प्रलोभन दाखवू नये सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीचे अनुषंगाने बकाले यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आल्याचे आयजींनी आपल्या आदेशात म्हटले असून बकाले यांना नाशिक येथील उपअधीक्षक (मुख्यालय) नाशिक ग्रामीण यांच्याकडे हजेरी लावण्याचे बजावण्यात आले आहे.
जिल्हापेठ पोलिसात गुन्हा, हजेरी मास्तराचे केले निलंबन
आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विनोद पंजाबराव देशमुख (जळगाव) यांच्या फिर्यादीवरून किरणकुमार बकाले (अधिकारी निवास, पोलिस मुख्यालय, जळगाव) यांच्याविरोधात भादंवि 153 अ, 153 ब, 166, 294, 500 व 509 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बकाले यांनी ज्या कर्मचार्याशी संवाद साधताना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले त्या जळगाव गुन्हे शाखेतील एएसआय अशोक महाजन यांनाही गुरुवारी निलंबीत केले असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.