⁠ 
शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2024

युवारंग महोत्सवातील विडंबन नाट्यात नारदमुनींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याने वाद

जळगाव लाईव्ह न्यूज | १० ऑक्टोबर २०२३ | कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे युवारंग महोत्सव मुळजी जेठा महाविद्यालयात सुरू आहे. या महोत्सवात दुसर्‍या दिवशी एका विडंबन नाट्य प्रकारात नारद मुनी यांची भूमिका चुकीच्या पध्दतीने दाखविण्यात आली. त्याच बरोबर नारद मुनी यांच्या बद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. यावर आक्षेप घेत अभाविप जळगावच्या कार्यकर्त्यांनी नाटक सुरू असतांना घोषणा देत नाटक बंद केले. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

विडंबन या कला प्रकारात एका महाविद्यालयातील संघाने नारद मुनींची भूमिका साकारली. या पात्रामुळे धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कलाप्रकार सादर होत असतानाच केला. यामुळे थोडा गोंधळ उडाल्यामुळे काही वेळासाठी सादरीकरणे थांबविण्यात आले. यानंतर काही वेळानंतर महाविद्यालयास सादरीकरण करु दिले. या प्रकारामुळे सायंकाळी पुन्हा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आयोजन समितीने अखेर संबधित महाविद्यालयास विडंबन या कलाप्रकारातून बाद करण्याचा निर्णय घेतला.

हिंदु देवी देवता बद्दल अश्या प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी भूमिका अभाविप तर्फे घेण्यात आली. कलेच्या नावाखाली, विडंबनाच्या नावाखाली, स्वतंत्र विचारसरणीच्या नावाखाली हिंदू धर्माचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. सर्व धर्मांचा सन्मान राखा, असा इशाराही अभाविपतर्फे देण्यात आला.

युवारंग महोत्सवामध्ये भारतीय प्रतिकांचा अपमान

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा मुळजी जेठा महाविद्यालयात सुरू असणाऱ्या युवारंग महोत्सवामध्ये भारतीय प्रतिकांचा अपमान झाला. चुकीची घटना सांगायला गेलेल्या कार्यकर्त्याना महानगर मंत्री नितेश चौधरी यांचं न ऐकता ढक्कबुक्की करण्यात आली. श्री. नारदमुनी यांची विटंबना करण्यात आली या घटनेचा अभाविप निषेध करते व दोषींवर कारवाई करण्याची मागणी करते.अभाविप भारतीय प्रतिकांचा अवमान सहन करणार नाही !

– नागेश गलांडे, प्रदेश मंत्री अभाविप