महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद : एकनाथराव खडसे झाले आक्रमक
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच विधानपरिषदेमध्ये आमदार एकनाथ खडसे यांनी तहसीलदारांना शिव्या देणारे, महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद असलेली गुंडांची क्लिप मंगळवारी सादर केली.यावेळी एकनाथराव खडसे आक्रमक झाल्याचे दिसले.
एकनाथराव खडसे यांच्या कन्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांच्या वाहनावरील हल्लाप्रकरणी दाखल तक्रारींचा पोलिसांनी तपास केला नाही. त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून दबाव टाकण्यात आला. वाळूमाफिया, गुन्हे दाखल असलेले, तडीपारीच्या नोटीस देण्यात आल्या होत्या, अशा गुंडांचे मुख्यमंत्री समर्थन करत असल्यास पोलिस काय तपास करणार असा आरोपही केला. पुरवणी मागण्यांसंदर्भात खडसे यांनी पोलिस आणि परिवहन विभागासंदर्भात प्रश्न उपस्थित केले.
यावेळी खडसे म्हणाले कि, २८ डिसेंबर रोजी कोथळी-मानेगाव येथे रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्या तक्रारीत सुनील पाटील, छोटू भोई, पंकज कोळी व इतर चार जणांची नावे होती. या गुन्ह्याची चौकशी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका आयपीएस अधिकाऱ्यांकडे दिली. नाशिक पोलिस आयुक्तांनी या तक्रारीची पूर्णपणे चौकशी केली नाही. ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल असताना त्यांना मोकळीक दिली. सत्य समोर आले पाहिजे, अशी मागणी केली.
याच बरोबर आंतरराज्यीय चेक नाक्यांवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या चर्चा विधिमंडळात झालेल्या आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश सीमेवरील पुरनाड चेकनाक्यावर तीन दिवसांपूर्वी वजनमापे काटे बंद होते. मॅन्युअल पद्धतीने पावत्या देण्यात येत होत्या. मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेवरील चेक नाक्यावर ट्रकमध्ये दीड ते दोन टनाचा फरक पडतो. महाराष्ट्रातील काटे फॉल्टी आहेत. प्रत्येक ट्रकवाल्याकडून ओव्हरलोडचे पैसे वसूल करण्यात येत आहे.
त्याच्या वसुलीचे काम जावेद नावाच्या गुंडाला देण्यात आले आहे. प्रत्येक ट्रककडून प्रत्येकी दोन हजार रुपये वसूल होतात. त्याचे लाइव्ह स्टेटमेंट आहे. त्याचा पेनड्राइव्हही खडसे यांनी सभागृहात आणला होता. बोगस पावत्या दिल्या जात असल्याबाबत तक्रारी केल्या आहेत. पथकाने तपासणी केली. तथ्य आढळूनही अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी केला.