⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | ‘ऑनलाईन’नव्हे; ‘ऑफलाईन’ शिक्षणाकडेच जाणार : उदय सामंत

‘ऑनलाईन’नव्हे; ‘ऑफलाईन’ शिक्षणाकडेच जाणार : उदय सामंत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा मंत्री असल्याने ठिकठिकाणच्या महाविद्यालयात, विद्यापीठांत जाण्याचा योग येतच असतो. त्या अनुषंगाने ‘कोरोना’चे संकट आता बर्‍यापैकी दूर झाल्यानेे मी पुन्हा महाविद्यालयांत, विद्यापीठांत जातो तेव्हा तेथे परीक्षा रद्द करणारा मंत्री आलेला आहे. अशी माझी प्रसिद्धी झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. मात्र, मी विद्यार्थी, पालक, संस्थाचालक अशा सर्वांनाच सांगू इच्छितो, की ‘ऑनलाईन’ शिक्षण पद्धती ही ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारने निवडलेला पर्याय होता. तो कायमस्वरूपी निवडलेला नाही. त्यामुळे यापुढे संपूर्ण शिक्षण पद्धतीत ‘ऑनलाईन’ नव्हे; तर ‘ऑफलाईन’कडेच जावे लागणार आहे. त्यामुळे संभ्रमावस्थेत राहण्याचे काहीही कारण नाही. तसेच ’ऑनलाईन’ पद्धतीतून उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यावर ‘कोविड’ बॅचचा विद्यार्थी म्हणून ठपका ठेवला जाणार नाही. तसेच येत्या दोन वर्षांनंतर ‘एमएच-सीईटी’ ही परीक्षा वर्षभरात एक नव्हे; तर दोन वेळा घेण्यात येईल. त्यात बारावीच्या अभ्यासक्रमाला 50 टक्के व एमएच-सीईटी परीक्षेसाठी 50 टक्के गुणांची विभागणी केली जाईल. म्हणजे बारावी 35 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालो, तरी चालते, ही मानसिकता दूर होऊन विद्यार्थ्यांचा कल अभ्यासाकडेच राहील, अशी स्पष्टोक्ती वजा घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी केली.

युवा सेनेतर्फे 26 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ‘युवा संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्नांवर ऊहापोह व्हावा, या उद्देशातून विद्यार्थ्यांच्या वतीने सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ (पुणे) यांच्याद्वारे मुलाखतीचे आयोजन केले गेले. त्यात गाडगीळ यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरे देताना ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पार्पण केले. त्यानंतर समस्त जळगावकरांच्या वतीने जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांचा, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील व विशाल वाणी, महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांचा युवा सेनेच्या पदाधिकारी वैष्णवी खैरनार, जया थोरात व यशस्वी वाघ, तर युवा सेनेचे विभागीय सचिव आविष्कार भुसे यांचा युवा सेनेचे पदाधिकारी शंतनू नारखेडे व अमित जगताप यांनी यथोचित सत्कार केला. तसेच कार्यक्रमाची मूळ संकल्पना राबविणारे युवा सेनेचे महाराष्ट्राचे सहसचिव विराज कावडिया यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांचा यथोचित सत्कार केला.

या प्रसंगी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, पंकज राणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ.हर्षल माने, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, युवा सेना महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी यांच्यासह युवा सेनेचे सर्व कार्यकर्ते व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राचार्य, संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटमध्ये युवा सेनेचे सदस्यांसाठी प्रयत्नशील : भुसे

गेल्या काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठात युवा सेनेने सिनेटचे सदस्यत्व निर्विवाद राखण्यात यश मिळविलेले आहे. त्याचा परिपाक म्हणून राज्यातील इतर विद्यापीठातही युवा सेनेचे सिनेट सदस्य पूर्ण ताकदीने निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेच. मात्र, माझ्याकडे नाशिक विभागाची जबाबदारी असल्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटमध्येही अथक परिश्रम घेऊन युवा सेनेचा प्रवेश कसा होईल यासाठी पुरेपूर प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी युवा सेनेचे विभागीय सचिव आविष्कार भुसे यांनी दिली.

मंत्री सामंतांकडून काही घोषणा

  • विद्यापीठ स्तरावर विद्यार्थी कौन्सिलिंग सेंटर उभारणे राज्य सरकारतर्फे सुरू
  • राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महाविद्यालयांना महिन्यातील तीन दिवस विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपक्रम राबविण्यासंदर्भात राज्य सरकार सक्ती करणार
  • उद्योग विकसनासंदर्भातील शिक्षण देण्याचा उद्योग मंत्रालय व तंत्रशिक्षण मंत्रालय यांच्या समन्वयातून राज्य सरकार प्रयत्न करणार
  • परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीत राज्य सरकार आणखी वाढ करणार
author avatar
टीम जळगाव लाईव्ह