जळगावच्या रस्त्यांवर आजपासुन ‘नो-हॉकर्स झोन’ : विक्रेत्यांना गाड्या न लावण्याचे आदेश
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांना गुरुवार १३ रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सक्त सूचना दिल्या. यानंतर देखील अतिक्रमणांचे सत्र सुरु राहिल्यास. शुक्रवार १४ पासून कारवाई करणार असून यातील साहित्य महापालिका जप्त करणार असल्याचे सांगितले.
गेल्या महासभेत शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवर अतिक्रमणाच्या प्रमाणात वाढ झाली असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागावर सर्वच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. नगर सेविका दीपमाला काळे यांनी कोर्ट ते गणेश कॉलनी चौक या रस्त्यावर असलेल्या हातगाड्या, भाजी विक्रेत्यांनी केलेलया अतिक्रमणाबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करूनही मार्ग निघत नाही, तर तेथील भाजी विक्रेत्यांना पेट्रोल पंपा शेजारी हक्काची जागा देऊनही सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असतांना, रोडावर भाजी विक्री करतात, गणेश कॉलनी परिसरातही हाच प्रकार असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, टॉवर चौक ते महाबळ, टॉवर चौक ते चित्रा चौक, चित्रा चौक ते कोर्ट चौक, कोर्ट चौक ते गणेश कॉलनी चौक या रस्त्यांवरील किरकोळ भाजी विक्रेते, हातगाड्या लावणारे यांच्यामुळे होणारे अतिक्रमण, यामुळे शहरात वाहतुकीचा होणार खोळंबा या सर्व गोष्टी लक्षात घेता. १४ जुलै पासून कडक कारवाई करणार असल्याच्या सूचना चारही प्रभागातील मुकादमांनी दिल्या.
या सूचना अतिक्रमण विभाग उपायुक्त गणेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख उमाकांत नष्टे संजय ठाकूर, साजिद अली,सतीश ठाकरे,संजय पाटील, नाना कोळी यांनी दिल्या.