राज्यात पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहणार ; जळगाव जिल्ह्यात कशी राहणार पावसाची स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२३ । अर्धा जुलै महिना झाला आहे तरी राज्यातील काही भागात अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावली नाहीय. यामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याची पातळी खालवली असून उशिरा आलेला मान्सून त्यानंतर पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे.
दरम्यान,बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय झाले झाला असून यामुळे राज्यात पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे. यादरम्यान, राज्यातील काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यात जळगाव जिल्ह्याला दोन दिवस पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसाार, राज्यात पुढचे ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट –
पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावतीसह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
16 Jul:पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 16, 2023
मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधारचा इशारा.
आज कोकण व विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस
Must see IMD Updates pic.twitter.com/aupDR4jOMG
जळगावला येलो अलर्ट :
जळगाव जिल्ह्याला उद्या म्हणजेच १८ आणि १९ जुलै ला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरीच्या केवळ १०६ टक्के पाऊस
दरम्यान, जळगाव जिल्ह्यामधील रावेर भाग सोडला तर अद्यापही पावसाने हवी तशी हजेरी लावली नाहीय. पावसाळ्याचा दीड महिला उलटून गेला मात्र जिल्ह्यात दमदार पाऊस नाहीय. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरीच्या केवळ १०६ टक्के पाऊस पडलेला आहे. १ जून ते १६ जुलै या दीड महिन्याची तुलना केली तर गतवर्षापेक्षा यंदा २७.२ टक्के कमी पाऊस पडला आहे; परंतु एकट्या जुलै महिन्याचा विचार केला तर यावर्षी १६ जुलैपर्यंत १३३.६ टक्के पाऊस पडला आहे.
यंदा जिल्ह्यात अद्याप जोरदार पाऊस झालेला नसल्यामुळे अपेक्षेप्रमाणे टक्केवारी वाढलेली नाही. धरणातील जलसाठ्यातही अपेक्षित वाढ झालेली नाही. जिल्ह्यात ६५० ते ७०० मि.मी. पावसाची गरज भासते. त्या प्रमाणात अद्याप निम्मादेखील पाऊस झालेला नाही. साधारणपणे सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे.