⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

मंगळग्रह मंदिर परिसरारात सापडले नवजात मुलीचे अर्भक

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर परिसरात शुक्रवारी एक दिवसाच्या मुलीचे जिवंत अर्भक सापडले असून, तिला येथील बालरोगतज्ज्ञ डॉ.शरद बाविस्कर यांच्या कस्तुरबा बालरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोलीस प्रशासन त्या मातेचा शोध घेत आहेत.

अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराजवळ असलेल्या दुकान क्रमांक दहाच्या छतावर एका टोपलीत गोधडीत गुंडाळलेले मुलीचे अर्भक शुक्रवारी सकाळच्या प्रहरी आढळून आले. तत्काळ पोलिस ठाण्याला माहिती कळवून बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांनी पोलिस प्रशासनास कळवून त्यांच्या परवानगीने तत्काळ उपचार सुरू केले.

बाळाचे तापमान २.५ व अंगावर जखमा, अंग थंड झालेले, साखर कमी झालेली आदी लक्षणे दिसून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि प्रसूतीतूनच हे बाळ जन्माला आले असल्याचेही लक्षणांवरून त्यांनी स्पष्ट केले. बाळाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असून, डॉ. बाविस्कर यांनी बाळावर मोफत उपचार केले आहेत.

दरम्यान, या बाळाला जन्म देणारी ती माता कोण, याचा शोध पोलिस घेत असून, या अर्भकास कुत्रे, मांजरापासून कोणताही धोका होऊ नये, यासाठीच जमिनीपासून वर सुरक्षित ठिकाणी आणि टोपलीत गोधडीत गुंडाळून ठेवल्याचे दिसून आले. याबाबत पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.