जळगाव जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांसाठी नवीन अपडेट; प्रशासनाने केले आवाहन, काय आहेत? जाणून घ्या..
जळगाव लाईव्ह न्यूज । रेशन कार्ड हे गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी रुपयांमध्ये धान्य आणि जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. या योजनेचा लाभ घेणारे लाखो नागरिक दर महिन्यात कमी रुपयांमध्ये रेशन मिळवतात. आता, रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे त्यांना धान्य दुकानावर रेशन आल्याची माहिती मोबाइलवर मेसेजद्वारे मिळेल. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने मोबाइल क्रमांक संलग्न करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जळगाव जिल्ह्यात एकूण ६ लाख ६१ हजार ६२० लाभार्थी आहेत नवीन नियमांनुसार, धान्य रेशन दुकानावर आल्यावर लाभार्थ्यांना मोबाइलवर मेसेज येणार आहे. प्रत्येक गावामध्ये रेशन दुकानदार सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचे धान्य देत नसल्याच्या तक्रारी अनेकदा केल्या जातात. आपल्या हक्काचे धान्य आपल्याला मिळते का? याची तपासणी अनेकजण ऑनलाइन पद्धतीने करतात. मात्र, ज्यांच्याकडे मोबाइल नाही, त्यांना काहीही माहिती मिळत नाही. परिणामी रेशन दुकानदार याचा पुरेपूर गैरफायदा उठवतात. म्हणून मोबाइल नंबर संलग्न करणे सोयीचे ठरणार आहे. तसेच स्वस्त धान्य दुकानात रेशनचा साठा आला का?, याचीही माहिती मोबाइलद्वारे मिळू शकणार आहे.
या नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी, लाभार्थ्यांना रेशन दुकानावर जाऊन आधार कार्ड आणि मोबाइल नंबरची नोंद करावी लागणार आहे. ही प्रक्रिया विनामूल्य असेल. अन्न व नागरी पुरवठा विभागाने आदेश दिले आहेत की शासकीय गोदामातून धान्य दुकानाकडे रवाना केल्यानंतर परिसरातील लोकांना लगेचच एसएमएस पाठवला पाहिजे.
किती गहू-तांदूळ घेतला मोबाइलवर कळणार
मोबाइल क्रमांकावर संबंधित रेशन कार्डवर दर महिन्याला किती धान्य देण्यात येते, त्याचबरोबर किती धान्य देण्यात आले आहे, याचीदेखील माहिती रेशनकार्डधारकांना एका एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. एवढेच नाही, तर तुम्हाला मिळालेले धान्य कुटुंबातील कोणत्या सदस्यांनी खरेदी केले आहे, याचीदेखील माहिती तुम्हाला एका एसएमएसद्वारे मिळणार आहे.
सहा लाखांवर रेशनकार्डधारकांची नंबर नोंदणी
जिल्ह्यातील सहा लाखांवर लाभार्थ्यांनी मोबाइल नंबरची नोंदणी केली आहे. ही नोंदणी ३ नोव्हेंबरपर्यंतची आहे. गेल्या दीड महिन्यात ही आकडेवारी वाढली आहे.