जळगाव लाईव्ह न्यूज । उन्हाळी सुट्ट्यांत अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात फिरण्याचं किंवा गावी जाण्याचं प्लानिंग करत असतात. यामुळे ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. याच दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने देशातील विविध मार्गावर १,४८४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये बडनेरा–नाशिक रोड दरम्यानच्या गाड्यांचाही समावेश असून यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे.

या विशेष गाड्यांमध्ये ७४९ आरक्षित, तर ७३५ अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आधीपासून चालवण्यात येणाऱ्या काही गाड्यांसह अतिरिक्त विशेष गाड्यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मुंबई – दौंड सोलापूर, पुणे – कोल्हापूर, नाशिक रोड बडनेरा, हडपसर – हरंगुळ या मार्गांवर विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

तसेच राज्याबाहेरील प्रवासासाठी मुंबई – बलिया, मुंबई गोरखपूर, दौंड -कलबुर्गी आणि सोलापूर – कलबुर्गी, अनकापल्ली या मार्गांवर विशेष गाड्या धावतील. लवकरच या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर होईल.
या सेवांमुळे उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे परिसरात नोकरी किंवा शिक्षणासाठी राहणारे अनेक प्रवासी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आपल्या गावी परत जातात. त्यांच्यासाठी या विशेष गाड्या अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.विशेष यातील बहुतांश गाड्या जळगाव, भुसावळ मार्गे धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेकडून घोषित उन्हाळी विशेष गाड्यांचे वेळापत्रक, थांबे, फेऱ्यांची संख्या तसेच आरक्षणाची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित स्थानकांवर उपलब्ध होणारी माहिती तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.







