जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२४ । नेपाळमधून बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली असून बस थेट नदी कोसळून १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या बसमध्ये भुसावळ तालुक्यातील भाविक प्रवास करत होते.
भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल परिसरातील 110 भाविक नेपाळ दर्शनासाठी 15 ऑगस्ट रोजी रवाना झाल्या होत्या. भाविक प्रयागराजपर्यंत ट्रेनने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बस बुक केल्या होत्या.
बसचा क्रमांक (युपी53 एफ.टी.7623) ही भाविकांना घेऊन पोखराहून काठमांडूला जात होती. त्यावेळी बस नेपाळमधील तणाहून जिल्ह्यातल्या मार्सयांगडी नदीच्या पात्रात कोसळली. हा अपघात आज शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडला. या बसमध्ये ४० प्रवासी स्वार होते. यातील १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, इतर अन्य १६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला वेग देण्यात आला.