⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

नेहरू युवा केंद्राच्या युवा उत्सवात युवांनी केली धमाल!

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२३ । भारत सरकारच्या युवा कार्यक्रम, क्रीडा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्र, जळगाव व जिल्हा प्रशासन, जळगावद्वारा जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुल, जळगाव येथे करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले पंच प्रण मुद्दे, राष्ट्रीय तृणधान्य वर्ष, जी-२० आणि वाय-२० या विषयांना हात घालणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

पहिल्या सत्रात दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जळगावचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, कर्नल पवन कुमार, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, लीड बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, केसीई आयएमआरच्या संचालिका शिल्पा बेंडाळे व इतर अधिकारी उपस्थित होते. नेहरु युवा केंद्राचे राज्य निर्देशक प्रकाश मनूरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी रूपरेषा स्पष्ट केली.

युवा उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या ५ पंच प्रणवर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात मुख्यत्वे गुलामी की हर सोच से मुक्ती यावर चित्रकला स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा, भाषण स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम, छायाचित्र स्पर्धा अशा विविध भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी युवा उत्सवात होती. १८ ते २९ वयोगटातील नवोदित कलावंतांकडून बहारदार सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विजयी उमेदवारांना खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील जवळपास १४०० युवक – युवती युवा उत्सवात सहभागी झाले होते. के.सी.ई. सोसायटी संचालित आय.एम.आर. महाविद्यालय उत्सवाचे सहयोगी महाविद्यालय होते. सर्व युवांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, कर्नल पवन कुमार यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या पुढील वाटचालीत युवकांच्या भूमिका व कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले.

युवकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी परिसरात विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. यात जिल्ह्यातील महिला बचतगट, तसेच विविध विभागातर्फ़े युवकांना योजनांची माहिती मिळावी म्ह्णून स्टॉल लावण्यात आले होते. यात जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी, नाबार्ड, केंद्रीय संचार ब्युरो, समाज कल्याण विभाग यांचा समावेश होता. केंद्रीय संचार ब्युरोेतर्फे विनोद ढगे व सहकाऱ्यांनी तृणधान्य महत्त्व विषद करणारे नाटक आणि राज्यगीत, पोवाडा सादर केला.

परीक्षक म्हणून अमृता भट, विनोद ढगे, अक्षय राजपूत आदींनी काम पाहिले तर प्रा.शमा सराफ, रणजीत राजपूत, भूषण लाडवंजारी, आनंदा वाघोदे, प्रणील चौधरी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नेहरू युवा केंद्र, जळगावचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल अजिंक्य गवळी, युवक प्रतिनिधी तेजस पाटील, रोहन अवचारे, हेतल पाटील, राहुल वाघ, राहुल जाधव, अनिल बाविस्कर, उमेश पाटील, कल्पना पाटील, पल्लवी तायडे, चांदणी कोळी, रविंद्र बोरसे, गौरव वैद्य आदींनी परिश्रम घेतले. सर्व सहभागी स्पर्धकांच्या जेवणाची आणि कार्यक्रमाची गैरसोय होऊ नये यासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या होत्या. असे युवा अधिकारी श्री. डागर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.