Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील धानोरा येथील नेहा नितिन परमार हिने चंदिगढ येथे नुकत्याच झालेल्या इंटर डायरेक्टरेट शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रकारामध्ये ६०० पैकी ४७५ पॉईंट मिळवत सिल्व्हर मेडल पटकावले.
धानोरा येथील नितीन व सुरेखा महाजन यांची मुलगी ही जळगाव येथील मु.जे. महाविद्यालयामधून बीएस्सीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून तिची NCC च्या माध्यमातून इंटर डायरेक्टरेट शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रकारामध्ये निवड करण्यात आली. यासाठी तीला प्रशिक्षक जयपाल व कर्नल प्रवीण भीमन (18 महाराष्ट्र बटालियन NCC) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. चंदिगढ येथे केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी मुळे नेहाची आता पुढे पश्चिम बंगाल येथे होणाऱ्या जि. व्ही.मालवणकर शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
खो खो स्पर्धेतही डंका
नेहा परमार हिने धानोरा हायस्कूल मध्ये शिकत असताना खेळा विषयी आवड असल्याने तीने खो खो मध्ये विशेष कामगिरी करून राज्य स्तरावर खो खो स्पर्धा देखील गाजवली होती.
सुवर्ण पदक मिळण्यासाठी कसून प्रयत्न करणार
शेतकरी कुटुंबातील असलेल्या नेहा ने ग्रामीण भागात राहून रायफल शुटिंग मध्ये प्राविण्य मिळवले आहे. या खेळासाठी तिला तिचे आई-वडील आणि परिवाराकडून सतत प्रोत्साहन मिळत गेले. नेहा सध्या पश्चिम बंगाल येथे होणाऱ्या जि. व्ही.मालवणकर शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेची जोरदार तयारी करत आहे. यात सुवर्ण पदक मिळण्यासाठी कसून प्रयत्न करणार असल्याची इच्छा तिने ‘जळगाव लाईव्ह’ शी बोलतांना व्यक्त केली. तर नेहाने रायफल शूटिंग स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याचा आनंद व्यक्त करून, तिचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे तिच्या आई-वडिलांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते सत्कार
नेहाच्या दैदिप्यमान यश मिळवले व ही ग्रामीण भागातील विद्यार्थीनी असल्याने तिचा सत्कार राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी नेहाला शुभेच्छा देऊन आगामी पश्चिम बंगाल येथे होणाऱ्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
धानोरेकरांकडून कौतुक
नेहा ही ग्रामीण भागात शिकून सुद्धा रायफल शुटिंग प्रकारात नाविन्यपूर्ण कामगिरी केली असून खेडे गावातील मुलींना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यासुद्धा उत्कृष्ठ खेळाळू होऊ शकतात असे दाखवून दिले आहे. नेहाच्या या कामगिरी मुळे गावातील महिला, पुरुष, मुले, मुली यांना नेहाचा अभिमान वाटत आहे. व तीचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक केले जाते आहे.