जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी भडगाव येथील नेहा निलेश मालपुरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. दरम्यान, जास्तीत जास्त युवा वर्गाने स्वविकासाबरोबर देश विकासाच्या या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन नेहा मालपुरे यांनी केले आहे.
सामाजिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, कला, सांस्कृतिक, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील कामासाठी नेहा मालपुरे यांचं नाव घेतलं जातं. विज्ञान व गणित विषयाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांसह कला क्षेत्रात त्यांनी जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेला असून गणाक्षर कलेसाठी त्यांची विशेष ओळख आहे.
देश पातळीवर सामाजिक, शैक्षिणक, पर्यावरण, युवा सक्षमीकरण अशा विविध स्तरात नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून युवा वर्ग काम करत असतो.
नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर विमल यांनी ही निवड केली असून, राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल वाकलकर, महाराष्ट्र राज्याध्यक्ष प्रशांत गुरव, महाराष्ट्र राज्य समिती सदस्य, उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तेजस पाटील तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष अनिल बाविस्कर आणि संपूर्ण जळगाव जिल्हा सहकारी सदस्य यांनी निवडीचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. युवा परिषदेच्या राज्य पातळीवरील निवडी संदर्भात नेहाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्या भडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मानवराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश मालपुरे व चित्रा मालपुरे यांची सुकन्या आहेत.