⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुन्हा जळगाव शहरात वाढता रस, मनपा निवडणुकीची चाहूल?

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात आजवर अनेक नेते आले आणि गेले. मनपाच्या सत्तापिठावर अनेकांनी सत्ता गाजवली आणि काही तर आज देखील आहेत. मनपातील बहुतांश चेहरे जुनेच असले तरी जळगाव देखील जुने आहे. किंबहुना जुने जळगाव तरी चांगले होते सध्या त्यापेक्षा वाईट झाले आहे. जळगावात कितीही राजकारण शिजले तरी शहराचा विकास काही होत नाही. जळगाव शहर मनपाची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असून गेल्या पंचवार्षिकला भोपळा गाठलेल्या राष्ट्रवादी काँगेसची पाऊले पुन्हा शहराकडे वळू लागली आहेत.

जळगाव शहर मनपावर आजपर्यंत अनेक वर्ष जेष्ठ नेते सुरेशदादा जैन यांच्या गटाचे वर्चस्व राहिले होते. आज जळगावात काहीच विकास झाला नाही असे वाटत असले तरी १९८० ते २००० च्या काळात शहराचा बऱ्यापैकी विकास झाला आहे. शहरातील व्यापारी संकुले, काही वर्षांपूर्वी गल्लोगल्ली दिसणारे काँक्रीटचे रस्ते, उद्याने हे सर्व तेव्हाच झाले होते. शहरात अनेक वर्ष सत्ता गाजविलेले नेते सुरेशदादा जैन यांनी देखील काही वेळेस पक्षांतर केले होते, त्यामुळे पक्ष कोणताही असो शहराचा काही विकास तरी झाला. सध्या तर राज्यात सत्ता नाही, केंद्रात सत्ता नाही म्हणून आम्हाला निधी मिळत नसल्याचे कारण देत विकासकामे रखडतात.

गेल्या पंचवार्षिकला तर केंद्रात आणि राज्यात देखील भाजपची सत्ता असताना जळगाव शहराचा काही चेहरा मोहरा बदलला नाही. मंत्री गिरीश महाजन यांनी तर विकासाच्या मोठ्या वल्गना केल्या होत्या. जळगावकरांनी देखील त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत एकहाती सत्ता भाजपच्या हाती सोपवली होती. इतकंच काय तर आजवर मनपात दिसणारा राष्ट्रवादी काँगेसचा एकही उमेदवार जळगावकरांनी निवडून दिला नाही. मंत्री गिरीश महाजनांचा व्याप वाढला आणि त्यांचे होम पीचवर दुर्लक्ष झाले. त्यांचेच प्यादे फितूर झाले आणि सर्वच खेळ बिघडला. प्यादे तर गेले राजावर टीका करू शकत नसल्याने वजीरच्या नावावर खापर फोडत गेले. जळगाव मनपातील भाजप नगरसेवक शिवसेनेच्या गोटात सामील झाले.

नगरसेवकांनी इकडून तिकडे उड्या मारल्याने जळगावकरांना तसा फारसा फायदा झाला नसला तरी नागरिकांच्या मनात मात्र किंतु परंतु निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीने नेमके हेच गणित ओळखले असे सध्या दिसत आहे. जळगाव शहर मनपात भोपळा गाठल्यावर राष्ट्रवादी थंडबस्त्यात गेली होती. राष्ट्रवादीचे विधानसभा उमेदवार अभिषेक पाटील यांनी सुरुवातीला काही आंदोलने केली परंतु नंतर ते देखील माघारी परतले. अभिषेक पाटलांच्या पदावर एकनाथराव खडसे समर्थक अशोक लाडवंजारी यांची वर्णी लागली. लाडवंजारी यांच्या नेतृत्वात शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा भरारी घेईल असे वाटत होते होते मात्र तसे काही झाले नाही.

माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांचे विधिमंडळात पुनरागमन झाल्यावर राष्ट्रवादी पुन्हा सक्रिय झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँगेसने जळगाव शहरात लक्ष केंद्रित केले असून आगामी मनपा निवडणुकीची हि चाहूल असल्याचे जाणवते. जळगाव शहर महानगरपालिकेकडे आजवर आ.एकनाथराव खडसे यांनी कधी लक्ष दिले नाही. एव्हाना गेल्या पंचवार्षिकला देखील त्यांनी प्रकृतीचे कारण देत मनपा निवडणुकीकडे दुर्लक्ष केले होते. सध्या खडसे विरुद्ध महायुती असे चित्र उभे राहिले आहे. भाजपचे नेते आणि पदाधिकारी खडसेंना कोणत्याही प्रकारे हरविण्यासाठीच उभे आहेत.

सर्व विरोधक एकवटले असले तरी आ.एकनाथराव खडसे त्यांना जोमाने उत्तर देत आहेत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकनाथराव खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. सध्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून एकनाथराव खडसेंचा त्याठिकाणी कस लागणार आहे. खडसेंच्या नेतृत्वातच जळगाव शहरात राष्ट्रवादी काँगेसला पुन्हा नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. जळगाव मनपा काबीज केल्यास विधानसभा निवडणुकीत देखील विजयाची आशा पल्लवित होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची अलीकडची आंदोलने, निवेदने आणि आजचा पाहणी दौरा हे सर्व आगामी मनपा निवडणुकीची चाहूल आहे हेच यावरून दिसते.