तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती – मंत्री गुलाबराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असा दावा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. या वेळी ते राष्ट्रवादीला चिमटा काढताना म्हणाले कि, राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो तशी ती वेळ होती.
याचबरोबर जर आताही आम्ही म्हणजेच शिंदे गटाने हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती, असे गुलाबराव पाटील म्हणाले. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर सरकार कोसळेल असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. यावरही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्या घरात वाढले, ज्या घराने ओळख दिली त्या घरात गद्दारी करणं चुकीचं आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते. त्यावरही त्यांनी पलटवार केला आहे. आम्ही पक्ष कुठे सोडला आहे? आम्ही मूळ शिवसेना आहोत. बोर्डावर पक्षाचे नावही तेच आहे. आम्ही भाजपमध्ये गेलो का? आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत, असा दावा त्यांनी केला.