एकनाथ शिंदेंचा आता राष्ट्रवादीला धक्का ; ‘हा’ नेता शिंदे गटाच्या वाटेवर
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते मंडळींनी शिंदे गटात प्रवेश केला. आता इतर पक्षातील नेते देखील शिंदे गटाच्या मार्गावर आहे. आता सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जुन्या फळीतील नेते आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनीसुद्धा शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच दिलीप कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती.
ही माहिती आता खरी ठरली आहे. कारण दिवाळीनंतर आपण 25 जणांना सोबत घेऊन शिंदे गटा प्रवेश करणार असल्याची माहिती दिलीप कोल्हे यांनी दिली आहे. दरम्यान, दिलीप कोल्हे यांच्या शिंदे गटामध्ये जाण्याच्या निर्णयाने सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान याआधी सोलापुरात महेश कोठे समर्थक नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला आहे.