⁠ 
सोमवार, मे 20, 2024

एकनाथ शिंदेंचा आता राष्ट्रवादीला दे धक्का ; 150 ते 200 पदाधिकारी शिंदे गटात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यांनतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे (BJP) नवीन सरकार स्थापन झाले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती झालेली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही (NCP) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्का दिला आहे.

यावेळी नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. 2 माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहे. जिल्हाध्यक्ष, नगरसेवक अशोक गावडे, नगरसेविका स्वप्ना गावडे यांच्यासह 150 ते 200 पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत.

या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे पक्षाला खिंडार पडलं असल्याचं सांगितलं जात आहे. पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांमुळे मागील आठवड्यातच अशोक गावडे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली होती. आता अखेर त्यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.