जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । राज्यात हनुमान चालीसा आणि लाऊडस्पीकरवरून राजकारण चांगलंच तापलेलं असून अशात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचा पठण करण्याची घोषणा केली असून त्यानंतर परिस्थिती बिघडत असल्याचे दिसून येत आहे. नवनीत राणा यांनी सकाळी ९ वाजताची वेळ दिली होती असून त्यापूर्वीच त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक पोहोचले आहे.
यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेरील अडथळे तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. अमरावतीचा कचरा साफ करण्यासाठी आलो असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. तसेच खार परिसरातील राणांच्या घराबाहेर ‘बोल बजरंग बली की जय’अशा घोषणा देण्यात आल्या. राणा दाम्पत्याच्या इमारतीच्या गेटवर मारुतीस्तोत्रच सामुहीक वाचन केलं आहे. सध्या आक्रमक झालेले शिवसैनिक शांत झाले आहेत. परंतु इमारतीच्या बाहेर शिवसैनिकांची गर्दी वाढत आहे.
नवनीत यांचे पती रवी राणा हे अपक्ष आमदार आहेत, दोघांनीही मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. नोटीस मिळाल्यानंतरही नवनीत राणा हनुमान चालिसाच्या पठणावर ठाम आहेत. राणा दाम्पत्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
यावेळी नवनीत राणा म्हणाले की, हल्ला झाला किंवा यंत्रणा बिघडली तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. आम्हाला मातोश्रीवर जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सत्तेचा दुरुपयोग होत आहे. हनुमान चालीसासाठी ठाकरेंकडून परवानगी घ्यावी लागत असेल, तर ते दुर्दैव आहे.असेही राणा म्हणाले. बजरंग बलीची शक्ती आमच्या पाठीशी आहे. आपण हनुमान चालीसा वाचायला जाऊ. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही.