जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव येथील एका दुकानातून सुमारे १ लाख ३३ हजार रुपयांच्या पाण्याच्या मोटारी विकत घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकच्या तिघांनी केला आहे. त्यातील एका आरोपीला ताब्यात घेण्यात चाळीसगाव शहर पोलिसांना यश आले आहे. या टोळीने नाशिक, धुळे, मालेगाव परिसरात गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चाळीसगाव शहरातील पटेल मशिनरी या दुकानावरून २० ते २१ जानेवारी दरम्यान अज्ञात व्यक्तींनी प्रथम ८२ हजार ५०० रुपये व नंतर ५० हजार ९६० रुपये किमतीच्या २ टेक्समो कंपनीच्या ५ हॉर्सपॉवरच्या पाण्याच्या मोटर व १६४ सुप्रीम कंपनीचे ३ इंची पाइप असे एकुण १ लाख ३३ हजार ४६० रुपयांचा माल घेऊन जावून दुकानदारास त्रयस्थ व्यक्तीचे चेक देऊन व चोरीच्या मोबाइल क्रमांकावरून फोन करुन विश्वासघात करुन फसवणूक केली. या प्रकरणी पटेल मशिनरीच्या मालकाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक निरीक्षक सागर कोते, पोकॉ. सचिन वाघ, शरद पाटील, गौरव पाटील (स्था.गु.शाखा), मिलिंद जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.
मुद्देमालासह आरोपी जाळ्यात
सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते व त्यांच्या पथकाने संशयित योगेश दोघा मोहीते (वय २५, नामपुर, ता. सटाणा, जि. नाशिक), सचिन जगन मोहीते (रा. म्हसरुळ, जि. नाशिक) व समाधान भानुदास चव्हाण (रा. सायणे, ता. मालेगाव) यांचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. त्यातील योगेश दोधा मोहीते यास अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३३ हजार ४६० रुपयांच्या २ पाण्याच्या मोटर व १६४ सुप्रीमचे पाइप जप्त केले.