हृदयविकाराच्या झटक्याने नायगाव येथील शिक्षकाचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच हृदयविकारा झटका आल्याने कोरपावली (ता. यावल) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक मुस्तफा तडवी याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुस्तफा नामदार तडवी (वय-५६, रा.नायगाव ता.यावल) हे कोरपावली येथील जिल्हा परिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. गुरुवार दि.११ रोजी ते शाळेत आले होते. यावेळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखायला लागल्याने त्यांनी ही बाब त्यांनी मुख्याध्यापक धनराज कोळी यांना सांगितली. मुख्याध्यापक कोळी यांनी तातडीने ही माहिती तडवी यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर तडवी यांचे भाऊ व नातेवाईकांनी कोरपावली येथे येऊन त्यांना नायगाव येथे घरी नेले. त्यानंतर भुसावळ येथे खासगी रुग्णालयात जाण्यास निघाले. मात्र, रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर त्यांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मृत घोषीत केले. याप्रकरणी सुपडू तडवी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.