सोमवार, सप्टेंबर 18, 2023

पाच वर्षीय बालिकेचा विहिरीत मृतदेह आढळला, यावल तालुक्यातील धक्कादायक घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२३ । यावल तालुक्यातील न्हावी येथील पाचवर्षीय बालिका आणि तिचे वडील तीन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यापैकी त्यांच्या मुलीचा मृतदेह गावालगत असलेल्या शेतविहिरीत आढळून आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अनिता बारेला असं मृत मुलीचे नाव असून मात्र मुलीचे वडील अद्यापही बेपत्ता असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

काय आहे घटना?
न्हावी-मारूळ रस्त्यावर ठुशा भावलाल बारेला हे कुटुंबासह राहतात. त्यांना तीन मुली आहेत. ते गुरुवारी (दि.१७) आपल्या पाच वर्षीय मुलगी अनिता बारेला हिला घेऊन घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाही. म्हणून त्यांचा शोध सुरू होता. अनिता गालफुगी, पोटफुगी, दमकोंडा अशा अनेक दुर्धर आजाराने त्रस्त होती.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी न्हावी गावाच्या शेत शिवारात असलेल्या सुनील फिरके यांच्या शेतविहिरीत अनिताचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीयअधिकारी डॉ. शिवदास चव्हाण यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाइकांना सोपवला. दरम्यान या मुलीचे वडीलदेखील अद्याप बेपत्ता आहे. त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. त्यानंतर घटनेचा उलगडा शक्य आहे.