जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात काल मंगळवारी १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यात रात्रीपर्यंत सरासरी ६५.५६ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील १६ नगरपालिका आणि २ नगरपंचायतीसाठी एकूण ४५२ जागांसाठी सुमारे १५६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दि २ डिसेंबर रोजी मतदान झाले. रात्री ९ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील एकूण आठ लाख ८१ हजार ५१० मतदारांपैकी ५ लाख ७७ हजार ८८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात २ लाख ९८ हजार ६५३ परुषांनी तर २ लाख ७९ हजार २२८ महिलांनी मतदान केलं. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात एकूण ६५.५६ टक्के मतदान झाले. त्यात एरंडोलमध्ये सर्वाधिक ७५.४९ टक्के मतदान झाले आहे. तर भुसावळात सर्वाधिक कमी ५४.९१ टक्के मतदान झाले.

दरम्यान, .मंत्र्यांसह आमदारांनी जोर लावल्यानंतरही संबंधित ठिकाणी भाजपला अखेरपर्यंत मतदानाचा टक्का वाढवता आलेला नाही. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मतदारसंघातील भुसावळ नगर परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले आहे. त्या ठिकाणी सावकारे यांची पत्नी रजनी सावकारे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. या खालोखाल भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील जामनेरमध्ये ६०.६८ टक्के, पक्षाचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार मंगेश चव्हाण यांच्या चाळीसगाव शहरातही ६२.५८ टक्के मतदान झाले आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगरातही ६४.४४ टक्केच मतदानाची नोंद घेतली गेली आहे
जिल्ह्यातील नगरनिहाय मतदानाचा टक्का?
जामनेरमध्ये ६०.६८ टक्के, भुसावळ ५४.९१ एवढे कमी मतदान झाले. यावलमध्ये ७३.१६ टक्के, फैजपूर ७२.९१ टक्के, राजकीय दृष्ट्या चर्चेत असलेल्या पाचोऱ्यात ६८.८२ टक्के, वरणगावमध्ये ७२.७१ टक्के, अमळनेर ६४.४८ टक्के, चाळीसगाव ६२.५८ टक्के, सावदा ६९.९९ टक्के, चोपडा ६७.९७ टक्के, भडगाव ६८.७० टक्के, रावेर ७४.७४ टक्के, धरणगाव ७२.५४ टक्के, पारोळा ७२.८७ टक्के, नशिराबाद ६८.११ टक्के, मुक्ताईनगर ६४.४४ टक्के तर शेंदुर्णीला ६९.८९ टक्के मतदान झाले.






