⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

महाराष्ट्र बंदसाठी माविआचे नेते रस्त्यावर पण दुकाने सुरूच.. गोलाणीत दुकानदाराची बाचाबाची

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यव्यापी संपाची हाक दिलेली आहे. बंदचे आवाहन करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास टॉवर चौकाकडून पायी निघाले. नेत्यांचा मान ठेवण्यासाठी व्यावसायिकांनी काही मिनिटे दुकाने बंद ठेवली परंतु त्यानंतर मात्र पुन्हा व्यापार सुरु झाले. दरम्यान, गोलाणी मार्केटमध्ये दुकान बंद करण्यास नकार दिल्याने माविआच्या कार्यकर्त्यात आणि दुकानदारामध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेत शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. घटनेनंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली तर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. घटनेच्या निषेधार्थ  ११ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यव्यापी बंद पुकारला होता. त्या अनुषंगाने सकाळी १० वाजता जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून बंद ठेवण्याचे आवाहन शहरातील व्यापारी व दुकानदारांना केले. टॉवर चौकापासून सुरुवात केल्यानंतर पायी फिरून शहरातील फुले मार्केट, दाणाबाजार, गांधी मार्केट, गोलाणी मार्केट, न्यू बी.जे. मार्केट, बोहरा गल्ली परिसर, चित्रा चौक परिसरात दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महानगराध्यक्ष शाम तायडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्या पाटील, काँग्रेसचे अशोक लाडवंजारी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.

आंदोलनात सहभागी माविआ पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला परंतु जळगावकर व्यापाऱ्यांनी त्यांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही. पदाधिकाऱ्यांचा मान म्हणून दुकानदारांनी काही वेळ दुकाने बंद ठेवत बंदचे पालन केले आणि नंतर पुन्हा दुकाने पूर्ववत झाले. जळगाव जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद लाभत असून सणासुदीच्या काळात व्यवसायाची आणि खरेदीची लगबग असल्याने नागरिकांनी व दुकानदारांनी आपापली कामे सुरु ठेवली आहेत.