जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात किरकोळ वादातून हाणामारी आणि हत्येसारख्या गंभीर घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून अशातच किरकोळ वादातून एका १९ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना यावल तालुक्यातील हिंगोणा येथे घडली. प्रथमेश मुकेश महाले (वय १९) असं मयत तरुणाचं नाव असून या घटनेत इतर तिघे जखमी झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

नेमकी घटना काय?
हिंगोणा येथे किरकोळ वादाचे स्वरूप घातक हाणामारीत रूपांतर झाले आणि प्रथमेश महाले याचा चाकूच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेत रीना मोहित गजरे (वय १९), मोहित राजेंद्र गजरे (वय ३०) आणि निखिल राजेंद्र गजरे (वय २६) हे तिघेही चाकूच्या वारात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव गौरव जाधव (रा. खिर्डी ता. रावेर, हल्ली मुक्काम हिंगोणा) असे समोर आले आहे. घटनेनंतर आरोपी फरार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.











