⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

१० वर्षाच्या मुलाचा नरबळी दिल्याप्रकरणी मांत्रिकासह १६ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । नेहमीच आजारी राहणारा मुलगा बरा व्हावा म्हणून मांत्रिकाच्या सल्ल्याने गावातीलच १० वर्षांच्या बालकाला शेतात जेवणाला बोलावून त्याला धरणात बुडवत नरबळी दिल्याप्रकरणी मांत्रिकासह अमळनेर तालुक्यातील डांगर बुद्रुक गावातील १६ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तब्बल एका वर्षांनी गुन्हा दाखल झाला आहे.

डांगर बु. येथील इंदल हिरामण चव्हाण यांचा मुलगा झिंग्या हा नेहमी आजार राहत होता. त्यामुळे मुलगा बरा व्हावा म्हणून इंदल याने जादू जादूटोण्यावर विश्वास ठेवून शेतात चावदस निमित्त ७ एप्रिल २०२० रोजी डाळ बट्टीच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. या जेवणासाठी त्यांनी गावातील सुभाष बसराज राठोड (वय 39) यांचा मुलगा सुदर्शन सुभाष राठोड (१०) याला निमंत्रण दिले होते. त्यानंतर त्याला बोलावून घेण्यासाठी झिंग्याला पाठवले होते. तो सुदर्शन याला घरून बोलावून घेऊन गेला.

त्यानंतर सुदर्शन याच्या कपाळावर टिळा लावून गळ्यात मिरची, लिंबू घालून सुदर्शन रोहिदास चव्हाण यांच्या शेताजवळील धरणात घेऊन गेले. त्याला धरणात बुडवून मारले. असा आरोप वडील सुभाष राठोड यांनी केला होता. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी रोहिदास हिरामण चव्हाण, मनीराम हिरामण चव्हाण, इंदल हिरामण चव्हाण, योगेश मनीराम चव्हाण, रामसिंग नंदा चव्हाण, दादू रोहिदास चव्हाण, निलेश रोहिदास चव्हाण, सोनी रोहिदास चव्हाण, निकिता इंदल चव्हाण, चंद्रकला मनीराम चव्हाण, तुळसाबाई रोहिदास चव्हाण, भारती इंदल चव्हाण, ताई रामसिंग चव्हाण, शंकर रामसिंग चव्हाण, नवसाबाई हिरामन चव्हाण (सर्व रा. डांगरी) आणि ज्ञानेश्वर चव्हाण (रा. रणाईचे) यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आला आहे.