जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । एरंडोल तालुक्यात असलेल्या वडिलोपार्जित शेतीच्या वादातून गुरूवारी बाप, काका व पुतण्यामध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन गुप्तांगावर केलेल्या मारहाणीत पुतण्याचा उपचार सुरू असताना जळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. उमेश महाजन असे मयताचे नाव असून नातेवाईकांनी हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत कुटुंबीयांनी दिलेली माहिती अशी की, मयत उमेश महाजन हे उच्चशिक्षित अभियंते असून आपल्या वडील आबा महाजन, पत्नी मयुरी महाजन, आई सुनीता महाजन, बहिण रूपाली महाजन व भाऊ निलेश महाजन यांच्या समवेत वास्तव्यास होते. त्यांच्याकडे वडिलोपार्जित जमीन होती ज्या जमिनीवर दरवर्षी अल्टुंपलटून शेती करायची याविषयावर त्यांचे त्यांचे काका सुरेश महाजन, तुकाराम महाजन व मगन महाजन यांच्यासोबत वाद होते. गुरुवारी उमेश महाजन यांचे वडील आबा महाजन व त्यांच्या भावांमध्ये वाद सुरू असताना उमेश महाजन मध्ये गेले व त्याच्या काकांनी व इतर साथीदारांनी उमेश महाजन यांच्यावर दगडाने व काठीने वार केले. यावेळी उमेश महाजन यांच्या गुप्तांगावर देखील वार करण्यात आले यामुळे त्यांची तब्येत खालावली व सिविल हॉस्पिटल मध्ये त्यांचा मृत्यू झाला.