⁠ 
बुधवार, फेब्रुवारी 28, 2024

काय सांगता…जळगावकरांनी थकवले महापालिकेचे तब्बल २३६ कोटी

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२३ । एकीकडे निधी नसल्याने जळगावकरांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याची ओरड केली जाते. महापालिकेवरील कर्जाचा डोंगर, कथित भ्रष्टाचाराबाबत नेहमीच चर्चा झडतात. शहराच्या रखडलेल्या विकासाची ही पहिली बाजू पाहतांना दुसरी बाजूही पाहणे तितकेच महत्वाचे आहे. महापालिकेची नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात घरपट्टी थकबाकी आहे. ही रक्कम थोडी थोडकी नसून तब्बल २३६ कोटी रुपये झाली आहे. यामुळे शहराच्या रखडलेल्या विकासासाठी आपणही जबाबदार नाही का? असा प्रश्‍न सुजाण जळगावकरांना पडल्याशिवाय राहणार नाही.

चुकीचा लोकप्रतिनीधी निवडून दिल्याने किती व कोणते नुकसान होवू शकते? यावर उपहासात्मक भाष्य करणारा एक व्हिडीओ ‘एक जळगावकर…असा दलिदंर होणे नाही’ जळगाव लाईव्हने नुकताच प्रदर्शित केला. शहरातील प्रतिष्ठितांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी या व्हिडीओचे मनापासून कौतूक केले. शहराच्या रखडलेल्या विकासावर केवळ राजकारणी व अधिकार्‍यांवर टीका करत बसण्यापेक्षा आपले कुठे चुकतयं? याचा शोध घेण्यासाठी जळगाव लाईव्हने एक छोटासा प्रयत्न केला आहे. याचाच पुढचा भाग म्हणजे, आजचा हा लेखन प्रपंच आहे.

सर्वसामान्य जळगावकर दरवर्षी प्रामाणिकपणे घरपट्टी, नळपट्टीसह अन्य कर नियमितपणे भरतो. यामुळे महापालिकेला आर्थिक गाडा ओढणे शक्य होते. मात्र काही जण घरपट्टीच भरत नाहीत त्याचा त्रास नियमितपणे कर भरणार्‍यांनाही सोसावा लागतो. हा प्रकार म्हणजे, आपण सर्वजण वीज चोरी न करता दर महिन्याला वीज बील भरतो, मात्र काही जण आकोडे टाकून वीज चोरी करतात. हे नुकसान भरून काढण्यासाठी महावितरण वीज बिलात वीज गळतीच्या नावाखाली आपल्याकडून तो पैसा वसूल करते. तसेच काहीजण कर भरत नाहीत त्याचा फटका सर्वांना सहन करावा लागतो.

जळगाव महापालिकेची नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात घरपट्टी थकबाकी आहे. ८८ कोटी मागील थकबाकी आहे. तर १४८ कोटी या वर्षाची, अशी एकूण २३६ कोटी थकबाकी आहे. महापालिकेकडील माहितीनुसार, सहा वर्षांपर्यंत थकबाकीदार काढले आहे. त्यात एक वर्षाचे ६,६६९, दोन वर्षांचे १८,१६१२, तीन वर्षांचे ५,५७०, चार वर्षांचे ५,४६०, पाच वर्षांचे २,३३२ आणि सहा वर्षांवरील ११,१७० मिळकतधारक आहेत. घरपट्टी वसुली कमी होत असल्यामुळे महापालिकेकडे निधीचा अभाव आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. ही वसुली वाढविण्यासाठी महापालिकेतर्फे मोहीम राबविण्यात येणार आहे. रक्कम न भरणार्‍या थकबाकीदारांचे नळ संयोजन बंद करणे, तसेच जप्ती करणे, अशी कारवाई करण्यात येणार आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी होण्यामागे केवळ जळगावकरांचा दोष नाही तर ही वसूली करण्यासाठी महापालिकेचे नियोजन देखील चुकले आहे. महापालिकेचे अधिकारी केवळ विशिष्ट ‘अर्थ’पूर्ण विषयांमध्ये विशेष रस घेतात. तसा रस घेवून योग्य पाठपुरावा केला असता तर इतकी थकबाकी झालीच नसती. आता ही चुक सुधारण्यासाठी महापालिकेतर्फे घरोघरी जाऊन वसुली करण्यात येणार आहे. यासाठी अभियंत्यासह सर्व अधिकार्‍यांचे पथक नियुक्त केले आहे. याशिवाय घरबसल्या रक्कम भरण्यासाठी महापालिकेतर्फे फोन पे, गुगल पे, डेबीट, क्रेडिट कार्ड, नेट बँकीग या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

महापालिकेकडून करची थकबाकी वसुलीसाठी अभय योजना देण्यात येत होती. यात मालमत्ता व पाणी पट्टीच्या थकबाकीदारांना दंडाच्या रक्कमेत सुट दिल्याने मोठ्याप्रमाणात कराची थकबाकी वसुल झाली होती. आताही थकबाकीची वसुली व्हावी यासाठी मनपाने अभय योजना जाहीर करून मालमत्ताधारकांना दंडाच्या रकमेत सवलत द्यावी, अशी मागणी महापौरांनी आयुक्तांकडे केली आहे. मात्र त्यावरही अद्याप निर्णय झालेले नाही.

एक जळगावकर - असा दलिंदर होणे नाही...शेवट जरूर बघा | Jalgaon Live News