मनपा इन ऍक्शन : शहरातील १५० बॅनर हटवले

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२३ । अनधिकृत बॅनर्समुळे शहराचे विद्रुपीकरण वाढत असल्यामुळे महापालिकेने त्याविरूध्द मोहिम हाती घेतली आहे. बुधवारी मनपाच्या बांधकाम विभाग, किरकोळ वसुली विभागाच्या माध्यमातून शहरातील १५० अनधिकृत बॅनर्स व २३ झेंडे काढण्यात आली.

महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दोन दिवसांपुर्वी अधिकाऱ्यांची बैठक घेवून शहराचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी अनधिकृत बॅनर्स, होडींग, फलकांवर कारवाई करण्यासाठी महिन्यातून दोन वेळा मोहिम राबविण्याच्या सुचना केल्या आहेत.

या अनुषंगाने मनपा उपायुक्त गणेश चाटे यांच्या सुचनेनुसार बुधवारी शहरातील विविध भागातील अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग हटविण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यात दिवसभरात ११५० बॅनर्स व २३ झेंडे काढून जप्त करण्यात आले आहेत. तसेच यापुढे देखील अशा स्वरुपाची कारवाई सुरुच राहणार असून मनपाची परवानगी न घेता बॅनर्स व होडींग लावणाऱ्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्याची कारवाई देखील केली जाणार आहे.