गुरूवार, सप्टेंबर 21, 2023

महापालिका सुरु करणार राज्यस्तरिय स्पर्धा परीक्षा केंद्र

जळगाव लाईव्ह न्यूज| २० ऑगस्ट २०२३। स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिका राज्यस्तरिय स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करणार आहे. त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाठीमागील सानेगुरुजी ग्रंथालयाची इमारत निश्चित करण्यात आलेली आहे. दरम्यान, मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत जळगाव महापालिकेला राज्य शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २३ रोजी होणाऱ्या महासभेत हा विषय मंजुरीसाठी घेण्यात आलेला आहे.

जळगाव शहरात स्पर्धा परिक्षेचे शासकीय केंद्र नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी मुंबई, पुण्याला जाऊन शिक्षण घेतात. स्पर्धेचे युग व तरुणांमधील क्षमता व विद्यार्थ्यांची संख्या पाहता महापौर जयश्री महाजन यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर आमदार तांबे यांनी जळगाव महापालिकेसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून महापालिका हद्दीत युवक माहिती केंद्र, अभ्यासिका बांधकाम, फर्निचर व डिजिटलायझेशन आदी कामे केली जाणार आहे.

जळगाव शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या केंद्राचा लाभ होणार आहे.यासंदर्भात राज्य शासनाने अधीसूचना काढली आहे. हे केंद्र सार्वजनिक मालकीच्याच ठिकाणी व्हावी व त्याचे स्वरुपही सार्वजनिकच असावे अशा सूचना अध्यादेशात नमूद करण्यात आलेल्या आहेत. सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना याची मोठी मदत होणार आहे. ई-निविदा राबवून हा प्रकल्प लवकर करण्यात येईल, अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली.

निसर्ग कवी तथा पद्मश्री ना.धों.महानोर यांचे नुकतेच निधन झाले. जळगावशी त्यांचा असलेल ऋणानुबंध पाहता त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात रहाव्यात म्हणून महापालिकेच्यावतीने शहरात महानोर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर जयश्री महाजन यांनीच हा प्रस्ताव महासभेत आणलेला आहे. स्मारकासाठी येणाऱ्या खर्चास सभेत मान्यता दिली जाईल.