⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मनपा विशेष : सागर पार्कवर लग्न करायची हौस असल्यास मोजावे लागणार २ लाख रुपये

जळगाव लाईव्ह न्युज | मनपा विशेष | जळगाव शहरातील किंवा बाहेरील नागरिकांना स्वतःचे किंबहूना कुटुंबियातील सदस्यांचे लग्न जळगाव शहरातील सागर पार्कवर करायचे असेल तर आता त्यांना मनपाला २ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. या आधी सागर पारेकर लग्न करण्यासाठी 50 हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र आता हेच भाडे पन्नास हजारावरून थेट दोन लाख रुपयांवर गेले आहे.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवक बंटी जोशी यांनी सागर पार्क वर होणारे कार्यक्रम अथवा लग्न कार्यक्रम यांच्या कडून जादा भाड्याची मागणी करावी असा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवला होता. यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे त्यावेळी महापौरांनी सांगितले होते. याच अनुषंगाने जळगाव शहर महानगरपालिकेच्या 17 व्या मजल्यावरील महापौर दालनामध्ये आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये विविध प्रकारचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला आयुक्त विद्या गायकवाड, महापौर जयश्री महाजन, नगरसेवक नितीन लढ्ढा, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक बंटी जोशी, नगरसेवक सुचिता हाडा आदी मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विविध प्रश्नांवर चर्चा झाली त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सागर पार्कवर होणारे लग्न समारंभ व इतर सभा. यावेळी निर्णय घेण्यात आला की, जर कोणत्याही नागरिकांना सागर पार्कवर लग्नसमारंभ करायचा असेल तर यांना दोन लाख रुपये भरावे लागतील. याच बरोबर जर एखादा राजकीय पक्षाला सभा घ्यायची असेल तर त्यांना तीन लाख रुपये भरावे लागतील. यासंदर्भातला ठराव लवकरच महासभेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. हा ठराव ३० तारखेच्या होणाऱ्या महासभेवेळी मंजूर करण्यात येणार आहे.

याचबरोबर बालगंधर्व नाट्यगृह मध्ये केवळ आणि केवळ धार्मिक आणि कलाक्षेत्रातील कार्यक्रमास घेण्यात यावेत असा देखील ठराव यावेळी महासभेसमोर ठेवण्यात येणार आहे. येत्या 30 मे रोजी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे या वेळी या प्रस्तावांना महासभेची मंजूरी देण्‍यात येणार येणार आहे.