⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

मुक्ताईनगर हत्या प्रकरण : पोलिसांपुढे खून झालेल्या महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MUktainagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावाजवळ मुक्ताईनगर ते बर्‍हाणपूर महामार्गवर संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे असणार्‍या पुलाच्या खालील बाजूस दि. २९रोजी सकाळी क्रुरपणे हत्या करून महिलेचा मृतदेह फेकण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. आरोपीने महिलेची हत्या करून प्लॅस्टीक कॅरीबॅगमध्ये मृतदेह लपेटून पुलाखाली फेकल्याचा पोलिसांचा कयास असून बेपत्ता झालेल्या महिलांच्या वर्णनावरून तसेच खबर्‍यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून महिलेची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आठवडाभरात सहा खुनांच्या घटना घडल्याने जिल्ह्यात पुरती खळबळ उडाली आहे.

मयत महिलेचे वय 30 ते 40 असून तिच्या डोक्यावर वार करण्यात आले आहेत तसेच महिलेचा मृतदेह ज्या प्लॅस्टीक गोणीतून आणून टाकण्यात आला त्यावर रामजी इंण्डस्ट्रीज प्रा.लि.अकोला असा उल्लेख असून अकोला भागातूनही महिलेबाबत माहिती काढली जात आहे. सुकळी शिवारातील फॉरेस्ट कम्पार्टमेंट 516 मुक्ताईनगर ते डोलारखेडा जाणार्‍या रोडच्या पुलाखाली सुकलेल्या पूर्णा नदीच्या पात्रात सिमेंट खंबा क्रमांक 2 व 3 च्यामध्ये महिलेचा प्लॅस्टीक कॅरीबॅगमध्ये गुंडाळलेला मृतदेह असल्याची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली. सुकळी गावचे पोलीस पाटील संदीप इंगळे यांनी मुक्ताईनगर पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेने लाल व पांढर्‍या चौकडी रंगाचा टॉवेल गुंडाळलेला असून रंगाने गोरी, उंची पाच फूट, अंगात लाल रंगाचे ब्लाऊज, लाल-पिवळ्या रंगाची साडी परीधान केली आहे तर अंगात राखाडी रंगाचा परकर, दोन्ही पायात पांढर्‍या धातुच्या चैनपट्या, त्यावर लाल रंगाचे डायमंड, डाव्या हाताच्या बोटामध्ये पांढर्‍या धातूची अंगठी त्यावर पांढर्‍या रंगाचे डायमंड (खडे) आहे. मयताची ओळख पटत असल्यास वा नागरीकांना काही माहिती असल्यास मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे. दरम्यान, ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मृतदेहाचे डीएनए नमूने घेतले आहेत.

सोमवारी सकाळी खुनाचे वृत्त कळतात अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, प्रभारी निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, उपनिरीक्षक राहुल बोरकर, हवालदार संतोष नागरे, गणेश मनुरे, धर्मेंद्र ठाकूर, विकास नायसे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पटनास्थळी शानपथक तसेच फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले.