जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानात खासदारांनीही घेतला सक्रिय सहभाग
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्लीन इंडिया उपक्रम सुरु केला आहे. जळगाव जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून महिनाभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महिनाभर सर्वांनी प्लास्टिकचा वापर करू नये, कोणालाही प्लास्टिक देऊ नये आणि प्लास्टिक घेऊ नये असा संदेश या माध्यमातून दिला जात आहे. आपण देशाचे नागरिक म्हणून क्लीन इंडिया, स्वच्छ भारत अभियान प्रत्येकाने राबविणे आवश्यक आहे. केवळ महिनाभर नव्हे तर नेहमीच सर्वांनी प्लास्टिकमुक्त परिसर ठेवून स्वच्छता ठेवावी, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी केले.
नेहरू युवा केंद्र, जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि.२ रोजी यावल तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानाचे उद्घाटन खा. खडसे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, खा. खडसे यांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवित कचरा संकलन केले. याप्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, पंचायत समिती उपसभापती भंगाळे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी यांच्यासह नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक उपस्थित होते.
स्वच्छ भारत मोहीम यशस्वी करावी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना युवा अधिकारी नरेंद्र डागर म्हणाले की, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानासह १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी महिनाभर प्लास्टिक उपवास पाळत प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात प्रत्येकाने विशेषतः तरुणांनी सहभाग नोंदवित नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांना सोबत घेऊन स्वच्छ भारत मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन केले.
प्लास्टिकमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा
प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी, जिल्ह्यातील नागरिकांनी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करून प्लास्टिकमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. स्वच्छ भारत अभियानात प्रत्येकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.