⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जळगाव जिल्ह्यात एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम राबविण्यात येणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । केंद्र शासनामार्फत आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) हा उपक्रम जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. 

जळगाव जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनतंर्गत एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) निहाय वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेबिनार कार्यक्रमात एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) मध्ये कार्यरत असलेले उद्योजक व नव्याने लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत असणाऱ्या (Non ODOP) उद्योगातील उद्योजक, वैयक्तिक लाभार्थी, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक गट/संस्था/कंपनी/फेडरेशन, उत्पादक सहकारी संस्था तसेच जिल्हास्तरावर कार्यरत असणाऱ्या विविध बँकांचे प्रतिनिधी, डी.पी.आर (DPR) तयार करण्यासाठी बँकांचे सेवानिवृत्त अधिकारी व कृषि विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ यांना सहभागी होणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

हा वेबिनार कृषि विज्ञान केंद्र, बारामती राज्यस्तरीय तांत्रिक प्रशिक्षण संस्था (SLTI) यांचेमार्फत आयोजित करण्यात येणार आहे. एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी केळी या विषयावर 18 ऑगस्ट, 2021 रोजी दुपारी 3 वाजता वेबिनार आयोजित करण्यात येणार आहे. या वेबिनारची लिंक वेबिनारच्या एक दिवस अगोदर  पाठविण्यात येणार आहे. तरी या वेबिनार कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.