खासदाराला अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावे : वाचा.. कुणी मारला टोला
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. यावरुन शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदाराला अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं, असा टोला खासदार रक्षा खडसे यांना लगावला आहे.
पुढे बोलतांना पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद होत असेल, त्याला कळत नसेल, त्यानं असा आरोप केला तर ठीक आहे. पण खासदाराचाच अर्ज बाद होत असेल तर तो काय गुलाबराव पाटलाने बाद केला का? असा खोचक प्रश्नही त्यांनी केला.
दोघांचे उमेदवारी अर्ज बाद
अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडून येणार आहेत. तर मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येणार आहेत. याच मतदारसंघातून खासदार रक्षा खडसे यांनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांचाही उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.