जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । शहरातील सावखेडा शिवारात असलेल्या जलाराम नगरातील १४ वर्षीय विद्यार्थी गेल्या दि.१६ जानेवारीपासून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी मुलाच्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासल्यानंतर शोध घेतला असता तपासाची लिंक लागली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक बाब उघड झाली असून मयत मुलाच्या आईचे एका तरुणाची अनैतिक संबंध होते. त्या संबंधात अडसर ठरत असल्याने आईनेच प्रियकराच्या मदतीने मुलाचा काटा दूर करण्याचा डाव रचल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले असून मयत मुलाच्या आईसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
सावखेडा शिवारात असलेल्या जलाराम नगरात विलास नामदेव पाटील हे राहतात. दि.१६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा पुरुषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील वय-१४ वर्ष याला मित्राचा फोन आल्याने तो त्याच्याकडे जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला. कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने दि.१८ रोजी याप्रकरणी तालुका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने गुन्ह्याचा शोध घेणेकामी मुलाच्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासले असता प्रमोद जयदेव शिंपी नामक तरुणाच्या मोबाईलवरून सर्वाधिक कॉल झाल्याचे समजले. प्रमोद शिंपीचे मोबाईल लोकेशन मध्यप्रदेश येत होते. पोलिसांनी चौकशी करून दि.२६ रोजी त्याला अटक केली.
तपासात पोलिसांनी प्रमोद शिंपी याची कसून चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहिती सांगितली. मयत प्रशांत याची आई मंगलाबाई पाटील हिझ्यासोबत प्रमोदचे गेल्या एक वर्षापासून अनैतिक संबंध होते. या संबंधाबाबत प्रशांत याला माहिती पडल्याने तो त्यात अडसर ठरत होता. प्रशांतचा काटा दूर करण्यासाठी त्याची आई मंगलाबाई व प्रमोद या दोघांनी डाव रचला.
कबूतरांमुळे झाला प्रशांतचा घात
प्रशांतला कबूतर पाळण्याची मोठी हौस होती. दि.१६ जानेवारी रोजी दुपारी प्रमोद शिंपी हा घरी आला. कबूतर ठेवण्याचा पिंजरा रावेर येथून घेऊन येऊ असे त्याने सांगितले. प्रमोद ओळखीचा असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून प्रशांत त्याच्यासोबत गेला. रावेर येथे दोर विकत घेतल्यानंतर प्रमोद प्रशांतला इमली नाल्याच्या जंगलात ता.अशीरगड, जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश येथे घेऊन गेला. जंगलात एका बोराच्या झाडाला गळफास देत त्याने प्रशांतचा खून केला.
आई, प्रियकराला १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
बुधवारी तालुका पोलिसांनी प्रमोद जयदेव शिंपी वय-३८ रा.विखरण, ता.एरंडोल याच्यासह मयत प्रशांतची आई मंगलाबाई विलास पाटील वय-३५ या दोघांना अटक केली. गुरुवारी दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या.पी.ए.श्रीराम मॅडम यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता पुढील चौकशीकामी दोघांना १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे ऍड.निखिल कुलकर्णी यांनी काम पाहिले.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल