⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024
Home | राजकारण | नगरसेवक फुटीचा बॉम्ब फडणवीसांच्या दौऱ्यात फुटणार

नगरसेवक फुटीचा बॉम्ब फडणवीसांच्या दौऱ्यात फुटणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुढे येत असलेल्या जळगाव मनपात तिसऱ्याच वर्षी खिंडार पडले आहे. अगोदर २७ नंतर ३ आणि आता पुन्हा ७ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. भाजपची गळती रोखण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येणार असले तरी त्यांच्या दौऱ्यातच नगरसेवक फुटीचा बॉम्ब पडण्याची शक्यता आहे. आपल्या विश्वासातील वाटणाऱ्यांनीच दगाफटका केल्याने भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता आहे.

जळगाव महापालिकेत मार्च अखेरीस झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेने भाजपमधील नाराज असणार्‍या तब्बल २७ नगरसेवकांना गळाशी लावत सत्ता संपादन केली होती. मात्र भाजपने प्रत्युत्तर म्हणून फुटलेल्या नगरसेवकांविरूध्द अपात्रतेची कारवाई सुरू केली. यामुळे अपात्रतेच्या कारवाईतून वाचण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच ३८ नगरसेवकांची आवश्यकता असल्यामुळे शिवसेनेने भाजपचे नगरसेवक फोडण्याची रणनिती आखल्याचे दिसून आले. अलीकडेच भाजपच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. तर अजून काही नगरसेवक या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले होते.

भाजपमधील काही नगरसेवक मुंबईत दाखल झाले असून त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवग्रह मंडळाचे प्रमुख उपमहापौर कुलभूषण पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत असून आता भाजपचा नवीन गट त्यांच्याच पुढाकाराने शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी जळगाव भाजपमधील नगरसेवकांच्या भेटीसाठी वेळ दिला असून यातच प्रवेशाचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, भाजपला लागलेल्या गळतीच्या पार्श्‍वभूमिवर, माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी काल रात्री तातडीने बैठक घेऊन नगरसेवकांनी राजकीय आत्महत्या करू नये असा इशारावजा सल्ला दिला. या बैठकीला भाजपचे २४ नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली. उद्या जिल्ह्यात येणार असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.