⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मंकीपॉक्सच्या एंट्रीने देशवासियांची चिंता वाढली, वेळीच ओळखा ‘ही’ लक्षणे

जळगाव लाईव्ह न्युज । १५ जुलै २०२२ । गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. अद्यापही जग कोरोना सारख्या महामारीतून सावरलं नाहीये. त्यातच आता मंकीपॉक्स या नव्या आजाराने चिंता वाढवली आहे. केरळमध्ये मंकीपॉक्सचा (Monkeypox) रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झालं आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने व्हायरसपासून बचावासाठी चाचण्या व इतर उपाययोजनांसाठी केरळ सरकारच्या मदतीसाठी मल्टि डिसिप्लिनेरी सेंट्रल टीन तैनात करण्यात येणार आहे.

दरम्यान, केरळ आरोग्य विभागाने मंकीपॉक्स विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. दरम्यान, रुग्णाची तब्येत स्थिर असून त्याला कोणताही त्रास जाणवत नसल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. तसंच, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची प्राथमिक चाचणी करण्यात आली असून घाबरण्याची गरज नाही, असंही प्रशासनाने म्हटलं आहे.

मंकीपॉक्स म्हणजे काय?
मंकीपॉक्स हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. देवीचा रोग ज्या विषाणूमुळं होतो त्याच विषाणूचा हा एकप्रकारे उपप्रकार आहे, असं म्हणायला हरकत नाही. संसर्ग झालेल्या रुग्णाशी जवळचा संबंध आल्यास हा रोग वेगाने पसरतो. हा विषाणूचा त्वचा, श्वसनलिका, डोळे, नाक किंवा श्वसनावाटे संसर्ग होऊ शकतो.

मंकीपॉक्सची लक्षणे काय?
सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना आणि अस्वस्थपणा यांचा समावेश होते. लागण झाल्यानंतर शरीरावर पुरळ येतं. रुग्ण बरा झाल्यानंतरही शरिरावर हे डाग तसेच राहतात.

मंकीपॉक्सचा संसर्ग कसा होतो
प्राण्यांना जर हा आजार झाला असेल आणि त्यांच्याशी थेट संबंध आला तर माणसाच्या शरिरात हा विषाणू प्रवेश करु शकतो. तसंच, रुग्णांचे वापरलेले कपडे किंवा रुग्णांशी थेट संबंध आल्यानंही या रोगाची लागण होऊ शकते. व्यक्तीला लागण झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत लक्षणे दिसतात.

मंकीपॉक्स विषाणू टाळण्यासाठी टिप
ज्या व्यक्तीला मंकीपॉक्ससारखे पुरळ दिसून येत आहे त्याच्याशी जवळ किंवा शरीराला टच करू नका.
मंकीपॉक्सची लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या चादरी, टॉवेल किंवा कपड्यांसारख्या वैयक्तिक वस्तूंना स्पर्श करू नका.
आपले हात साबणाने आणि पाण्याने धुवा किंवा अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर वापरा.
जर तुम्हाला मंकीपॉक्सची लक्षणे दिसत असतील तर घरीच रहा.
तुमच्या पाळीव प्राण्यांपासूनही अंतर ठेवा.
मंकीपॉक्स विषाणूवर कोणताही अचूक उपचार नाही.