Jalgaon : प्रौढाला दुचाकीच्या डिकीत लाखोंची कॅश ठेवणे पडले महागात..
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२४ । जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यातच दुचाकीच्या डिकीत अडीच लाख रुपयांची रोकड ठेवून हार्डवेअरच्या दुकानात जाणे एका प्रौढाला चांगलेच महागात पडले आहे. ही घटना इच्छादेवी चौक परिसरात घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अज्ञात चोरट्याक्रुिद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
म्हसावदच्या दीपक धोंडू चिंचोरे (५१) यांनी मित्राकडून अडीच लाख रुपये उसनवार घेतले होते. ही रक्कम परत करण्यासाठी त्यांनी २३ जूनला दुपारी जनता बँकेच्या ओंकारेश्वर शाखेतील पत्नीच्या खात्यातून अडीच लाख रुपये काढले. ते एका पिशवीत गुंडाळून दुचाकीच्या (क्र.एमएच.०४.एफएन.३९१७) डिकीत ठेवले. दुपारी १२.३० वाजता इच्छादेवी चौकात दुचाकी थांबवून ते हार्डवेअरच्या दुकानात गेले.
तेवढ्यात चोरट्याने त्यांच्या डिकीतील पैशांवर हात साफ केला. चिंचोरे दुकानातून सामान घेऊन आल्यावर त्यांना डिकीची चेन उघडी दिसली. त्यांनी डिकी तपासल्यावर त्यांना अडीच लाखांची रक्कम गायब झाल्याचे दिसून आली. त्यांनी आजूबाजूला पैशांचा शोध घेतला. तसेच नागरिकांनाही विचारपूस केली. पण, पैसे मिळून आले नाही. अखेर पैसे चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर मंगळवारी दीपक चिंचोरे यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून संपूर्ण फिर्याद दिल्याने गुन्ह्याची नौद केली आहे.