⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

एरंडोलात मोकाट कुत्रे व डूकरांचा हैदोस

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । एरंडोल शहर व परिसरात मोकाट कुत्रे आणि डूकरांनी हैदोस घातला असून यामुळे लहान मुले, महिला व नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मोकाट कुत्र्यांनी अनेक लहान मुलांना चावा घेतला असून या मोकाट कुत्रे आणि डूकरांचा नपाने बंदोबस्त करावा अशी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

शहरातील माळीवाडा येथील रहिवासी भिका महाजन यांच्याकडे टाकळी येथील आलेल्या लहान मुलास कुत्र्याने चावा घेऊन दहशत निर्माण केली आहे. तसेच मागील आठवड्यात देखील मुल्ला वाड्यातील अफजल यांच्या पाच वर्षाच्या मुलीस मोकाट कुत्र्याने चावा घेऊन ३० फुटापर्यंत फरफटत नेऊन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नपा प्रशासनाकडे नागरिकांनी निवेदन देऊन तक्रार देखील केली आहे. येथील मेन रोड, गल्लीबोळात त्यांच्या झुंडीच्या झुंडी बसलेले असतात. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहनचालकांच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे अनेकदा अपघात देखील झालेले आहेत. रोज सकाळ-संध्याकाळी फिरायला जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा कुत्र्यांच्या झुंडीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे काही ज्येष्ठ नागरिकांनी फिरणे देखील बंद केले आहे. तसेच शहरात डुकरांनी देखील हैदोस घातला आहे. नपा कर्मचार्‍यांनी गटारी काढल्यानंतर तिच्यातील घाण रस्त्यावर अस्ताव्यस्त करीत असून ये-जा करणार्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पसरलेल्या घाणीमुळे अस्वच्छता आणि रोगराई पसरून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या उन्हाळ्याची सुरूवात असून महिला वर्ग घरातील धान्य, डाळी, पापड अंगणात सुकविण्यासाठी टाकत असता त्यावरही डूकरे ताव मारतात. प्रसंगी त्यांना हाकलण्यासाठी गेलेल्या महिलांच्या अंगावर देखील धावून येत असतात. त्यामुळे शहरात सर्वच ठिकाणी यांची दहशत पसरली आहे.

नागरीकांनी याबाबत नपा प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी देवून देखील दुर्लक्ष करीत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. या मोकाट कुत्रे आणि डूकरांचा बंदोबस्त न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा नागरीकांनी नपास दिलेला आहे.